पिंपरी (प्रतिनिधी) – एकाच फ्लॅटची अनेकांना विक्री करीत फसवणूक प्रकरणी सोलापूर महापालिकेच्या उपमहापौराला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र त्याच्यामध्ये करोना सदृष्य लक्षणे आढळल्याने पुन्हा हजर राहण्याची नोटीस देऊन सोडण्यात आले. ही घटना सांगवी येथे शनिवारी (दि. 30) दुपारी घडली.
राजेश दिलीप काळे (वय 42, रा. सोलापूर) असे सांगवी पोलिसांनी सोलापूररहून ताब्यात घेतलेल्या उपमहापौराचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काळे याने सन 2002 मध्ये पिंपळे निलख येथील औदुंबर सोसायटीत एक फ्लॅट घेतला होता. बनावट कागदपत्र तयार करून त्याने हा फ्लॅट अनेकांना विकला होता. याप्रकरणी 2019 मध्ये सांगवी पोलिस ठाण्यात आणि 2007 मध्ये निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, या गुन्ह्यात काळे यांना ताब्यात घेण्यासाठी सांगवी पोलिस ठाण्यातील एक पथक सोलापूरला रवाना झाले होते. आरोपीला घेऊन हे पथक शहरात दाखल झाले. शनिवारी दुपारी पुरावे गोळा करण्यासाठी सांगवी पोलीस ठाण्यात आरोपीची चौकशी सुरू होती. दरम्यानच्या काळात उपनिरीक्षकास न सांगता त्यांचा रायटर काळे यांना घेऊन चौकीत गेला. यामुळे आरोपी पळून गेल्याचा समज झाला होता.
दरम्यान सांगवी पोलीस उपमहापौर काळे यांची चौकशी करीत असताना त्यांना सतत शिंका येत होत्या. तसेच त्यांना तापाची लक्षण जाणवत होती. पुढील धोका टाळण्यासाठी आम्ही त्यास पुन्हा हजर राहण्याची नोटीस देऊन उपचाराकरिता सोडून दिले.