नवी दिल्ली – ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांनी आज दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. संघटनेतील विविध ताण तणाव आणि कामाचा दबाव यामुळे आपण हे पद सोडत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. 20 महिन्यापुर्वीच त्यांची या अध्यक्षपदावर निवड झाली होती. या काळात त्यांचे संघटनेचे सरचिटणीस विनोद तिहारा यांच्याशी वाद होत असत. तिहारा यांना संघटनेत मोठे समर्थन आहे.
या संघटनेत वेस्टेड इंटरेस्ट खूप आहेत आणि क्रिकेटच्या हितापेक्षा येथे बाकीचेच राजकारण अधिक चालते असे रजत शर्मा यांनी म्हटले आहे. त्याच कारणासाठी आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
मला माझ्या पदाच्या जबाबदारीचे काम पारदर्शकपणे करता येणे अशक्य झाल्याने आपल्या प्रामाणिकपणाशी तडजोड करण्यापेक्षा राजीनामा देणेच आपण पंसत करू असेही त्यांनी म्हटले आहे. अरूण जेटली यांच्या समर्थनामुळे रजत शर्मा हे या संघटनचे अध्यक्ष झाले होते.
अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आपल्याला काम करताना अनेक अडथळे आणले गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच आपण आज हा राजीनाम्याचा निर्णय घेत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले आहे.