प्रशांत जाधव
पुराचा फटका शाडूच्या मूर्तींना पीओपीच्या मूर्तींना वाढती मागणी
सातारा – अतिवृष्टीमुळे कराड, पाटण भागात आलेल्या पुराचा फटका जसा लोकांना बसला तसाच गणेशमूर्ती बनवणाऱ्या कुंभारवाड्यातील कारागिरांना बसला आहे. कुंभारवाड्यात तयार झालेल्या शाडूच्या गणेशमूर्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. गणेशोत्सवासाठी जेमतेम आठवडा उरल्याने नव्याने मूर्ती बनवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे बाजारात शाडूच्या मूर्तींची आवक घटली असून राजस्थानी मूर्तिकारांच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना “अच्छे दिन’ आले आहेत. शाडूच्या मूर्तींच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने सातारा शहरातील लहानलहान गणेशोत्सव मंडळांना राजस्थानी मूर्तिकारांचा आधार आहे.
गणेशोत्सव म्हणजे लहानापासून थोरांपर्यंत सर्वांसाठी आनंदाची उधळण करणारा उत्सव आहे. बुद्धीच्या देवतेचा उत्सव साजरा करताना सर्व जण आकर्षक मूर्तींची प्रतिष्ठापना करतात. या मूर्ती साधारणपणे उत्सवाच्या किमान तीन महिने अगोदर बनवण्याची लगबग कुंभारवाड्यांमध्ये सुरू होते. मात्र, यावर्षी सातारा जिल्ह्यातील कराड,पाटणसह सांगली व कोल्हापूरसह त्या जिल्ह्यांमधील अनेक गावांना अतिवृष्टीमुळे महापुराचा तडाखा बसला.
त्यामुळे जनजीवन विस्कळीत तर झालेच, शिवाय तेथील अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे. या महापुराचा फटका कुंभारवाड्यांनाही बसला. या ठिकाणी तयार झालेल्या गणेशमूर्ती आणि मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने गणेशमूर्ती ऐनवेळी कोठून उपलब्ध करायच्या असा प्रश्न पडला आहे. हा प्रश्न राजस्थानी कलाकारांनी बहुतांश प्रमाणात सोडवला आहे.
त्यांनी सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्याचे काम गतीने सुरू केले आहे. गेली काही वर्षे गणेशभक्तांचा कल पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींकडे वाढल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या मागणीत घट झाली होती. राजस्थानी कलाकारांनी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून गणेशमूर्तींऐवजी कलाकुसरीच्या इतर कामांकडे लक्ष दिले होते. मात्र, कराड, पाटणसह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थीतीमुळे गणेशोत्सवात मूर्तींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा आधार असल्याने राजस्थानी कलाकारांना अच्छे दिन आले आहेत.
पर्यावरणपूरक मूर्ती बसवल्या जात असल्याने आमच्या मूर्तींना मागणी कमी झाली होती. मात्र, यावर्षी आलेल्या पुरामुळे अन् कुंभारवाड्यातील मूर्तींचे प्रमाण कमी झाल्याने आमच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना मागणी वाढली आहे. त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात मूर्ती बनवण्याचे काम सुरू केले आहे.
शुकराज बिश्नोई राजस्थानी मूर्तिकारआम्ही दरवर्षी पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करत होतो. मात्र, यावर्षी कुंभारवाड्यात मूर्तींचे प्रमाण अत्यल्प असल्याने राजस्थानी कलाकारांनी तयार केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे “गणपती बाप्पा आम्हाला यावर्षी माफ कर’.
सोमनाथ कदम, गणेशभक्त.