मुंबई – आयपीएल 2022 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव झाला आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबईचा 23 धावांनी पराभव केला. राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकात 8 बाद 170 धावा केल्या.
निर्धारित धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि अनमोलप्रीत सिंग हे झटपट बाद झाले. यानंतर मुंबई संघाची “डावी आघाडी’ ईशान किशन आणि तिलक वर्मा या दोघांनी डाव सावरला. या दोघांनीही फटकेबाजी करत अर्धशतकं ठोकली.
ईशान किशनने 5 चौकार आणि एक षटकारासह 54 धावा केल्या. तर तिलक वर्माने 33 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांसह 61 धावा केल्या. परंतु हे दोघे बाद झाल्यानंतर अन्य फलंदाज अपयशी ठरल्याने मुंबईला 20 षटकांत 8 बाद 170 धावांपर्यतच मजल मारता आली. राजस्थानकडून नवदीप सैनी आणि यझुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी निवडल्यामुळे राजस्थानचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. राजस्थानने निर्धारित 20 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 193 धावा फलकावर लावल्या. राजस्थानकडून सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने शानदार शतक झळकावले.
राजस्थानकडून इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज बटलर आणि युवा भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वाल सलामीला फलंदाजीसाठी आले होते. मात्र मुंबईच्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याला केवळ एका धावेवर पव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र बटलरने एक बाजू धरून ठेवत मुंबईच्या भेदक माऱ्याचा सामना करताना 100 धावा केल्या.
या खेळीदरम्यान त्याने 68 चेंडू खेळले आणि 5 षटकार व 11 चौकारही मारले. यासह यंदाच्या मोसमात शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. तर संजू सॅमसन 30 धावा आणि हेटमायरने 14 चेंडूत 35 धावांचे छोटेखानी योगदान दिले. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि टायमल मिल्स यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 8 बाद 193 (जोस बटलर 100, संजू सॅमसन 30, शिमरॉन हेटमायर 35. जसप्रीत बुमराह 3-17, टायमल मिल्स 3-35) मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 8 बाद 170 (ईशान किशन 54, तिलक वर्मा 61, कायरान पोलार्ड 22, नवदीप सैनी 2-36, यझुवेंद्र चहल 2-26)