जयपूर: राजस्थानमध्ये भाजपकडून सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला होता. आता हे राजकीय संकट अधिकच गडद होत आहे. एका ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानच्या राजकारणाला वेगळं वळण मिळत आहे.
गुरुवारी कॉंग्रेसने काही ऑडिओ टेप समोर आणल्यानंतर राजस्थान पोलिस स्पेशल ऑपरेशन ग्रुपने केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, संजय जैन आणि कॉंग्रेसचे आमदार भंवरलाल शर्मा यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. या ऑडिओ टेपमध्ये कॉंग्रेसने थेट केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचे नाव दिले आहे.
पोलिस स्पेशल ऑपरेशन ग्रुप प्रथम ऑडिओ टेपची सत्यता तपासेल. या प्रकरणात पोलिसांनी कलम १२४ए आणि १२०बी मध्ये एफआयआर नोंदविला आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली केंद्रीयमंत्र्याविरुद्ध कलम१२४ ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाचे आमदार भंवरलाल आणि विश्वेंद्र सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले. काही ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत ज्यात आमदार भंवरलाल शर्मा, संजय जैन आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचे आवाज आहेत.
सुरजेवाला म्हणाले, या टेपमधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की भाजपा जनमताचे अपहरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्यावर स्पेशल ऑपरेशन ग्रुप व्दारे खटला चालविला गेला आणि चौकशीत ते चुकीचे आढळल्यास त्यांना अटक केली जावी, अशी मागणी देखील सुरजेवाला यांनी केली होती.