जयपूर : जयपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिला ड्रग इन्स्पेक्टरला पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. इन्स्पेक्टरला अटक होताच धक्कादायक खुलासा समोर आला आहे. यामध्ये हे माझ्या एकटीसाठी नाही, मला वरपर्यंत पैसे द्यावे लागतात. पैसे न दिल्यास बिकानेरला बदली करणार अशी धक्कादायक माहिती या महिला इन्स्पेक्टरने दिली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
सिंधू कुमारी असे लाच घेणाऱ्या महिला ड्रग इन्स्पेक्टरचे नाव आहे. जयपूरमधील 500 मेडिकल स्टोअर्सच्या तपासणीची जबाबदारी सिंधू यांच्यावर होती आणि त्या प्रत्येक दुकानातून दरमहा पाच हजार रुपये गोळा करत असे. दहा दिवसांपूर्वी एका औषध दुकानमालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सिंधू यांची तक्रार केली होती. यामध्ये अनेक वर्षांपासून औषध निरीक्षक सिंधू कुमारी 5 हजार रुपये घेत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.