जयपूर – राजस्थानातील कॉंग्रेस सरकारने राज्यातील 1 कोटी 35 लाख महिलांना मोफत स्मार्ट फोन देण्याची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री डिजिटल सेवा योजनेअंतर्गत हे स्मार्ट फोन दिले जाणार असून त्या कामात देशातील तीन दूरसंचार कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे.त्यासाठी तीन कंपन्यांनी निवीदा सादर केल्या असून त्यांच्या निवादांचे मुल्यांकन करून हे फोन देण्याचे काम प्रत्यक्षात सुरू केले जाईल असे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुढील वर्षी त्या राज्यात विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. त्याच्या आधी हे काम केले जाणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 12,000 कोटी रुपये आहे. सरकारी प्रकल्पाच्या तांत्रिक निविदा बुधवारी येथे उघडण्यात आल्या.राज्यात सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापुर्वी महिलांना स्मार्ट फोन देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री डिजिटल सेवा योजनेची घोषणा केली होती.
या योजनेअंतर्गत, चिरंजीवी आरोग्य विमा योजनेत नोंदणी केलेल्या 1.35 कोटी कुटुंबातील महिला प्रमुखांना तीन वर्षांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेले स्मार्टफोन दिले जाणार आहेत. हे मोबाईल दोन सीमकार्डांचे असतील त्यातील एक सीमकार्ड सरकार सुरूवातीच्या टप्प्यात सुरू करून देणार आहे.