जयपूर – राजस्थानातील बंडखोर कॉंग्रेस नेते सचिन पायलट आणि त्यांच्या 18 समर्थक आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्यान्वये जी अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे त्या नोटिशीला आव्हान देणाऱ्या अर्जावरील निर्णय राजस्थान उच्च न्यायालय येत्या 24 जुलैला देणार आहे.
तोपर्यंत या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या संबंधात राजस्थान विधानसभेच्या सभापतींनी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी सूचनाही कोर्टाने केली आहे. त्यामुळे राजस्थानातील राजकीय नाट्यामधील अनिश्चितता 24 जुलैपर्यंत तरी कायम राहणार आहे.
दरम्यान, कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाची आज पुन्हा तिसऱ्यांदा बैठक घेण्यात आली. या आधीही या पक्षाच्या अशा दोन बैठका झाल्या आहेत. कॉंग्रेसचे आमदार जयपूरमधील एका हॉटेलात वास्तव्याला असून तेथेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री गेहलोत यांनी कॉंग्रेसचे आमदार ज्या एकजुटीने पक्षाच्या पाठीशी उभे आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. गेहलोत म्हणाले की, पक्षाच्या कोणत्याही आमदारावर कसलेही दडपण किंवा दबाव नाही. त्यांच्याकडील मोबाइल फोन त्यांच्याकडेच ठेवण्यात आले आहेत.
यावरून ही स्थिती स्पष्ट व्हावी असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना नमूद केले. याउलट सचिन पायलट यांच्या गटात असलेल्या कॉंग्रेस आमदारांचे फोन काढून घेण्यात आले असून त्यांच्यापैकी अनेकांना तेथे बंदी करण्यात आले आहे, असा आरोपही गेहलोत यांनी केला.