Bus Accident : राजस्थानमध्ये भीषण रस्ते अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जोधपूरहून सांचोरकडे जाणारी खासगी बस बालोतरा जिल्ह्यातील कल्याणपूर परिसरात ट्रेलरला जोरदार धडकली. सरवडी गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की बसच्या चालकाच्या बाजूचा भाग पूर्णपणे चुराडा झाला. धडकेनंतर बसच्या काचा फुटल्या आणि अनेक प्रवासी आत अडकले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. आपत्कालीन दरवाजा आणि तुटलेल्या काचांमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने बालोतरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जोधपूर येथील एमडीएम रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे. एसीपी छावी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये पाना देवासी यांचा मुलगा नागराम, भगवानराम यांची मुलगी अनुषा, नरपत, तसेच ५ वर्षांचा युवराज आणि १५ महिन्यांचा शिवराज यांचा समावेश आहे. एका मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, पोखरण सरकारी रुग्णालयातील नर्सिंग कर्मचारी धारूराम हे आपल्या कुटुंबासह घरी परतत असताना या अपघातात सापडले. त्यांच्या दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.