बनगरवाडीतला राजाराम विठ्ठल सौंदणीकर : एक लोकशिक्षक

अंगावर साधासा शर्ट, पायजमा, डोक्‍यावर टोपी घातलेला फाटक्‍या तब्बेतीचा राजाराम विठ्ठल सौंदणीकर बनगरवाडीत शिक्षक म्हणून एक दिवस अचानक बंद पडलेल्या शाळेसाठी अवतीर्ण होतो आणि हळूवारपणे पाच-पन्नास उंबरा असणाऱ्या साऱ्या बनगरवाडीचाच लोकशिक्षक होऊन जातो. त्याची ही वाचकाच्या मनाचा ठाव घेणारी कादंबरीच्या रूपाने अवतरलेली कथा!

बनगरवाडी’ ही व्यंकटेश माडगुळकरांनी 1955 साली लिहिलेली एक अभिजात साहित्यकृती. धनगरांची वस्ती असणारे बनगरवाडी हे माणदेशातले एक खेडेगाव. मातीच्या भिंती असणारी घरं. तीस-पस्तीस उंबरा असणाऱ्या गावची माणसं साधी, पण मानवी मनाचे विविध कंगोरे वेळोवेळी दाखविणारी. या गावी राजाराम मास्तरची बदली होते. घरून पहाटे पायी निघालेला राजाराम दुपारच्या वेळी बनगरवाडीत पोहचतो त्यावेळी वाडीत बायामाणसांशिवाय फारसं कोणी नसतं. सारे पुरुष आपापल्या मेंढ्या घेऊन दूरदूर गेलेले असतात. उन्हाने त्रस्त झालेला मास्तर बनगरवाडीत पोहचतो आणि एका झाडाखाली विसावतो. बनगरवाडीत धुळीचं साम्राज्य असतं. घरांना मोठाली अंगणं आणि पाठीमागे मेंढरं कोंडण्यासाठी जागा. मास्तर बराच वेळ झाडाखाली बसतो पण कोणाचीच चाहूल लागत नाही.

रस्त्यावरुन जाणारा एक माणूस विनाकारण चौकशी करुन पुढे जातो, मग बऱ्याच वेळाने एक वयोवृद्ध माणूस हळूहळू काठी टेकत मास्तरजवळ येतो आणि हा गावाला लाभलेला नवीन मास्तर आहे, हे त्याच्या लक्षात येते. हा वयोवृद्ध माणूस गावचा कारभारी असतो. यापूर्वी असणारा मास्तर उचापतीखोर असल्याने येथून गेला, तेव्हापासून शाळा ओस पडल्याचे कारभाऱ्याकडून वर्तमान कळते. दोन खणात शाळा भरत असल्याचेही मास्तरला कारभाऱ्याकडून कळते. शाळा उघडून बघितल्यावर शाळेची अवस्था बिकट असल्याचे मास्तरला दिसते. बरं बनगरवाडीची ही शाळा अगदी वेळेनुसार चोख भरणे वा भरवणे शक्‍य नाही हेही मास्तर उमगतो. मुलांच्या वेळेनुसार शाळेच्या वेळेत बदल करावा लागणारी ही शाळा असते.

प्रथमदर्शनी मास्तरचा प्रभाव पडत नसला तरी त्याचे आदबशीर वागणे आणि विनयशील बोलणे साऱ्यांना जवळचे वाटू लागते. पहिल्या दिवशी रात्री शाळेच्या अंगणातच दहा-वीस गावकरी जमतात. गच्च अंधार असतो. त्या अंधारात मास्तरला उमजत नाही. कारभारी आयबूला सांगून चिमणी मागवतो. हा आयबू मुलाण्याचा. पहिल्याच दिवशी मास्तरला चिटकतो, तो थेट मास्तर गावातून बदली होऊन परतेपर्यंत. शाळा पुन्हा एकवार सुरू व्हावी ही मास्तरची तळमळ असते. दुसऱ्या दिवसापासून सवडीप्रमाणे मुलं पाठवू असे मास्तरला सांगण्यात येते. दर शनिवार-रविवार गावी जाऊन हवं ते घेऊन येण्याचा मास्तरचा शिरस्ता होतो. शाळेत आता दहा-बारा-पंधरा मुलं येऊ लागतात. पण लघवीच्या-पाण्याच्या नावाने बाहेर पडलेला मुलगा परत येईलच याची काही खात्री नसायची. शेतीची कामं, मेंढरामागे जाणे या गोष्टी आपोआपच मुलांच्या गळ्यात येत असल्याने शाळेकडे दुर्लक्ष होई. पण मास्तरच्या प्रेमळ स्वभावामुळे मुलांनाही शाळेची गोडी लागते. अल्पावधीत रामा बनगर, आनंदा रामोशी, आयबू मुलाणी, कारभारी बाबा यासारखे बरेच लोक मास्तरच्या पाठीशी उभे राहतात. हळूहळू मास्तर शाळेसोबतच गावकऱ्यांच्या समस्या-संकटं निवारण्याकामीही मदत करू लागतो.

एक दिवस रामा बनगर सारे जातात तरी रेंगाळत बसतो तेव्हा त्याला काहीतरी सांगायचे आहे, हे मास्तरच्या लक्षात येते. मग तोंडाला कुलूप लावून बसलेला रामा बोलू लागतो आणि मास्तरला कळते की रामाजवळ चांदीचा बुचडाछाप रुपया आहे. तो त्याला मास्तरच्या ओळखीने त्याच्या गावातून मोडून आणायचा आहे. त्याकाळी इंग्लंडच्या राणीचे चित्र असणारे रुपये म्हणजे बुचडाछाप. रामाचा रुपया मास्तर घेतो आणि शनिवारी गावी जाऊन मोडून आणतो. रामाला ती मोड आल्यावर सुपुर्द केल्यानंतर रामा घरी जाऊन परत येतो, कारण रुपयाचे सोळा आणे देण्याऐवजी अठरा आणे मिळालेले असतात. रामाला वाटते, मास्तरचे दोन आणे चुकून आलेले आहेत. पण मास्तर त्याला ते दोन आणे त्याचेच आहेत असे सांगितल्यानंतरही त्याचा विश्‍वास बसत नाही. तो मास्तरला ते दोन आणे घेण्याचा आग्रह धरतो. पण मास्तर त्याचे ऐकत नाही.

शनिवारी जाताना लोकांची मास्तरच्या गावी असणारी कामं घेऊन जाणं आणि सोमवारी येताना ती करून आणणे ही मास्तरची एक मोठी जबाबदारी होऊन बसते. औषधे, वाणसामान, कापडचोपड अशी अनेक वस्तूंची यादी मास्तरकडे दर शनिवारी अवतीर्ण होते, त्यातून माणसंही जोडली जातात. एक दिवस रामा मास्तरला घरी घेऊन जातो आणि त्याच्याजवळ असणारे जवळजवळ साडेतीनशे चांदीचे रुपये मोडीसाठी देतो. मास्तरला हे मोठे संकट वाटते. पण रामासाठी ही कामगिरी तो करतो. सोमवारी भाकरी आणि त्या रुपयांची मोड घामेघूम होऊन डोक्‍यावर घेऊन मास्तर येतो. शिणल्यामुळे मास्तरचा खोलीत आल्यावर डोळा लागतो.

थोड्या वेळाने जाग आल्यावर उशाशी ठेवलेली भाकरी आणि सारे पैसे चोरीला गेल्याचे मास्तरच्या लक्षात येते. मास्तरसाठी हा खूप मोठा धक्‍का असतो. मास्तरला कमालीची बेचैनी येते. एवढे मोठे पैसे कुठून उभे करायचे हे मास्तरला उमगेनासे होते. घरी गेल्यावर वडिलांना मास्तर हा प्रकार सांगतो, त्यावेळी वडीलही रागावतात, पण आई म्हणते, “गावाकडील जागा विकून टाक आणि आलेले पैसे रामाला दे’ मास्तरला अशी काळजी पडलेली असताना अचानक आनंदा रामोशी मास्तरकडे येतो आणि विचारू लागतो, “मास्तर तुमचे काही पैसे हरवले का?’ मास्तरला मोठे आश्‍चर्य वाटते, कारण ही गोष्ट कोणाला कळू नये यासाठी मास्तरने खबरदारी घेतलेली असते. मास्तर त्याला “हो’ म्हणतो आणि आनंदा “मास्तर हे घ्या पैसे’ असं म्हणून पैशांची थैली मास्तरच्या पुढ्यात ठेवतो. मास्तरला पुन्हा एकदा आश्‍चर्य वाटते. त्यातले तीन रुपये खर्च केले, असेही आनंदा सांगतो. मास्तरला एकीकडे त्याच्या या कृतीचा रागही येतो आणि त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुकही वाटते. मास्तरच्या डोक्‍यावरचा एक मोठा भार उतरतो.

मास्तरच्या दृष्टीने एक अभूतपूर्व घटना घडण्याकडे गावाची वाटचाल सुरू होते. एके दिवशी मास्तरला वाटते, या गावात पाचपन्नास जण उठबस करतील अशी चांगली जागाच नाही. अशी जागा आपण बांधली पाहिजे. या विचारातून मास्तर कारभाऱ्याजवळ गावात तालीम बांधण्याचा मनोदय व्यक्‍त करतो. अखेरीस मास्तर काही वृद्धांना तालमीचे महत्त्व पटवतो आणि कारभाऱ्यासह हे सारे वयस्कर लोक तालीम बांधण्यासाठी मास्तरच्या मागे उभे राहतात. ते उभे राहिल्यामुळे गाव उभे राहते आणि मग जागा शोधली जाते. गावात एक पडावयास झालेले वाण्याचे घर असते. वाणी परागंदा झालेला असतो. ती जागा मास्तर हेरतो पण प्रत्यक्ष कामाला कोणीच धजत नाही. अखेरीस मास्तर त्याच्या विद्यार्थ्यांसह एक दिवस कुदळ-पावडी घेऊन ते पडकं घर उतरवू लागतो आणि गाव जागं होते. अल्पावधीत जागा मोकळी होते. तालमीच्या उद्‌घाटनासाठी पंतसरकार अर्थात राजेसाहेबांना बोलवायचे मास्तर लोकांना सांगतो. गावात पहिल्यांदा राजा येणार या विचारानेच गावकऱ्यांत चैतन्य पसरते. पण सुरुवातीचा उत्साह फार काळ टिकत नाही.

लोकवर्गणीतून आणि श्रमदानातून तालीम उभी करायची असते. गवंडी-सुतार-बिगारी सगळेच कामाला भिडतात. पण काम मात्र मुंगीच्या पावलाने पुढे सरकते. लाकडाची गरज गावकरी भागवतात पण बाळा धनगर मात्र त्याच्या शेतातले लिंबाचे झाड प्राण गेला तरी देणार नाही असे सांगून गावाचा अपमान करतो. त्या क्षणापासून गाव त्याच्यावर बहिष्कार टाकते. वर्ष उलटते आणि मास्तरने पाठविलेल्या पत्राला पंतप्रतिनिधींच्या कार्यालयातून उत्तर येते, “महिन्याभरात राजेसरकार तालमीच्या उद्‌घाटनाला येणार.’ बस मग काय सारं गाव एकजुटीने कामाला लागते. एकीकडे तालमीचे बांधकाम आणि दुसरीकडे गावाची स्वच्छता. शेवटच्या रात्री रात्रभर तालमीवर छप्पर घालण्याचे काम सुरू राहते. त्याचवेळी काम करत असताना रात्री शिडीवरून आयबू मुलाणी खाली पडतो. त्याला फ्रॅक्‍चर होते. पण काम चालूच राहते. सकाळी साडेआठला राजेसाहेब गावात येतात. कारभारी त्यांना नारळ देऊन स्वागत करतो. राजेसाहेब मास्तरचे आणि गावकऱ्यांचे खूप कौतुक करतात. ही सगळी घटनाच गावासाठी अभूतपूर्व असते.

पुढे एक दिवस कारभाऱ्याला काही विचित्र स्वप्न पडते आणि उद्या मी जाणार असं कारभारी सगळ्यांना सांगू लागतो. लोक त्याला वेड्यात काढतात पण दुसऱ्या दिवशी कारभारी खरोखरीच शेवटच्या प्रवासास निघून जातो. येणाऱ्या पावसाळ्यात पाऊस पडत नाही. गावात दुष्काळ पडतो. मास्तर हवालदिल होतो पण उपाय काहीच नसतो. दुष्काळामुळे गाव ओस पडते. हळूहळू माणसं पोटासाठी दुसरीकडे जातात. सगळे गाव बाहेर पडते. अशा निराशाजनक वातावरणात एक दिवस मास्तरच्या बदलीचा आदेश येतो. तीन वर्षांपूर्वी आलेला मास्तर सामान आवरतो. ते सामान डोक्‍यावर घेऊन आयबू मुलाणी मास्तरला सोडवायला निघतो. मास्तर आणि आयबू हळूहळू पुढे सरकतात आणि उजाड बनगरवाडी मागे पडते.

माडगूळकरांनी रंगवलेला हा मास्तर वाचकाच्या मनात घर करून बसतो. पुढच्या गावी मास्तर कसा राहिला असेल, त्याच्याभोवती नवीन माणसं कशी गोळा झाली असतील, तिथला त्याचा अनुभव कसा असेल असे अनेक प्रश्‍न वाचकांच्या मनात रेंगाळू लागतात.

डॉ.विनोद गोरवाडकर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.