मुंबई : माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोड चिट्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंद मठाजवळ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केलं तसंच कोकणातील शेकडो कार्यकर्त्यां नी देखील शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोकणातील ढाण्या वाघ पुन्हा शिवसेनेच्या गुहेत आला. शिवसेनेत राजा का बेटा राजा नही बनेगा. जो काम करेल तो पुढे जाईल. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची, कार्यकर्त्यांची आहे. तुम्ही आमच्या शिवसेना परिवारातील आम्हाला तुम्ही सहभागी होताय त्याचा आनंद आहे. मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. जिथे विचारांना लागली वाळवी, तिथे कसा राहिल राजन साळवी, असा बॅनर मी वाचला. तिकडे लागली वाळवी म्हणून इथे आले राजन साळवी, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, जे पक्षात येतील त्यांचे स्वागतच आहे. कारण गेल्या अडीच वर्षांमध्ये बाळासाहेबांच्या, आनंद दिघेंच्या विचारांच्या शिवसेनेत आमदार, खासदार, नगरसेवक तसेच अनेक नेते शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांना बाळासाहेबांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर आम्ही सत्ता स्थापन केली. अडीच वर्षे आम्ही जे काम केले ते लोकांना माहीत आहे आणि म्हणून विश्वास लोक दाखवत आहेत कामावर, हे काम करणारे सरकार आहे घरी बसणारे नाही, असं शिंदे म्हणाले.
काय म्हणले राजन साळवी?
राजन साळवी म्हणाले, विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत झालेला पराभव आपण मान्य केला. रत्नागिरी जिल्ह्यात आता शतप्रतिशत शिवसेना करणार आहे. मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्यावर बातम्या सुरु झाल्या. राजन साळवी यांना विधान परिषद देणार किंवा मोठी जबाबदारी देणार असल्याचे म्हटले जावू लागले. परंतु मी स्पष्टपणे सांगू इच्छितो.
मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सर्व काही मिळाले. मला काहीच नको. मला फक्त माझ्यासोबत राजापूर मतदार संघातील आलेले शिवसैनिक, पदाधिकारी यांचा योग्य सन्मान व्हावा, हीच अपेक्षा आहे. उदय सामंत पालकमंत्री आहेत. त्यांनीही मला छोटा भाऊ म्हणून समावून घ्यावे, असे राजन साळवी यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना राजन साळवी म्हणाले, ९ फेब्रुवारी रोजी मी एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यांच्याकडे शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मला कुटुंबात घेण्याची तयारी दर्शवली. आज माझ्या दोन्ही डोळ्यात अश्रू आहेत. ३८ वर्ष शिवसेनेत असताना नगरसेवकापासून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.
या संपूर्ण वाटचालीत तो पक्ष सोडून नवीन घरात यावे लागत आहे, त्यामुळे एका डोळ्यात दु:खाचे अश्रू आहेत. दुसऱ्या डोळ्यात आनंदअश्रू आहे. कुटुंबात परत येत आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत जावू शकलो नाही, ही खंत आहे. पण त्या वेळी वेगळी परिस्थिती होती, असंही राजन साळवी म्हणाले.