राज ठाकरेंना ईडीच्या नोटीसीवरून राजकारण तापले

संग्रहित छायाचित्र

कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा संताप ः चूक नसेल तर घाबरण्याचे कारण काय-मुख्यमंत्री

मुंबई  (प्रतिनिधी) – कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली असून त्यांना 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. ईडीच्या नोटीसीवरून राज्यातील राजकिय वातावरण तापले असून सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तर ईडीची नोटीस म्हणजे सरकारी दडपशाही असल्याचा संताप कॉंग्रेसने व्यक्त केला आहे. दरम्यान, ईडीचा राज्य सरकारशी संबध नसून चूक नसेल तर घाबरण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने पाठविलेल्या नोटीसीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, मला खरे तर या नोटीसबाबत काहीच माहिती नाही. प्रसारमाध्यमांमधूनच मला याची माहिती मिळाली. कारण ईडीचा राज्य सरकारशी काहीच संबंध नाही. मुळात जर कोणाची चूक नसेल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. चौकशीला बोलाविले असेल तर जावे लागेल. जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे ते स्वतः किंवा त्यांचे वकिल देउ शकतात.
ईडीने दिलेल्या नोटीसीबद्दल मनेसेने 22 ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हा बंदची हाक दिली आहे. त्याबद्‌दल विचारले असता, जर त्यांची बाजू खरी असेल तर सामान्य लोकांना कशाला त्रास द्यायचा. पण कायदा व सुव्यवस्था जर कोणी हातात घेण्याचा प्रयत्न केला तर तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

ही सरकारची दडपशाहा – बाळासाहेब थोरात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शहा यांच्या हुकुमशाही विरोधात ठामपणे उभे राहिल्यामुळेच त्यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा कॉंग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राज ठाकरे यांना ईडीने पाठवलेली नोटीस ही मोदी-शाह यांनी सुडबुद्धीने केलेली कारवाई आहे. ही जोडी लोकशाहीला हरताळ फासून हुकुमशाही पद्धतीने देश चालवत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणाऱ्या प्रत्येकाच्या मागे ईडी, इन्कम टॅक्‍स, सीबीआय यांच्या चौकशा लावल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. मोदी-शहा जोडी संविधानिक संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे, हे लोकशाहीसाठी घातक आहे. सरकार विरोधात बोलणाऱ्यांना ईडीच्या नोटीसा पाठवायच्या, देशद्रोही ठरवायचे हाच मोदी-शहा यांचा न्यू इंडिया आहे, असेही थोरात म्हणाले.

विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न – नवाब मलिक

राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढून सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला. देशभरात विविध यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दाबण्याचा मोदी सरकारचा प्रकार सुरु आहे. ईडी किंवा सीबीआयचा दुरुपयोग कसा करायचा हे सरकारने दाखवून दिले आहे, असा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी विरोधकांना अशाप्रकारे संपवत असतील तर विरोधी पक्षाची जबाबदारी आहे की एकजुटीने याविरोधात एकत्र येऊन मुकाबला केला पाहिजे असे सांगतानाच आम्ही एकत्र येवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राजकीय दृष्टीने पाहू नये – संजय राऊत

ईडीच्या नोटीसचे आपल्याला विशेष काही वाटत नाही. या प्रकरणाकडे राजकीय दृष्टीने पाहू नये, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. देशातील अनेक राजकीय नेते हे उद्योग-व्यवसायात आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांत त्यांना व्यावसायिक दृष्टीने अशा नोटीसा येत असतात. आपल्या तपासी यंत्रणांवर चांगले संस्कार आहेत. त्यांना निष्पक्षपणे काम करू दिले पाहिजे. तसेच सरकारविरोधात मी देखील आवाज उठविला होता. मला कधी अशी नोटीस आली नाही, असेही राऊत म्हणाले.

आमचा आवाज दाबाल तर रस्त्यावर उतरू – संदीप देशपांडे

आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. कर नाही त्याला डर कशाला, असा सवाल करतानाच आमचा आवाज जर कोणी दाबायचा प्रयत्न केला तर मनसे रस्त्यावर उतरेल असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे हिटलर असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जो विरोधात बोलतो त्याच्यावर भाजपा दबाव आणतो. ईडी भाजपाच्या कार्यकर्त्यांसारखी वागत आहे. अशा कार्यकर्त्यांसोबत कसे डील करायचे हे आम्हाला चांगलेच माहिती आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपाच्या नेत्यांच्या एकाही घोटाळ्याची चौकशी कशी झाली नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)