मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची “सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाउन भेट घेतली. राज्यातील अस्थिर राजकीय पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांच्या भेटीला महत्व आले आहे.
शनिवारी संध्याकाळी राज ठाकरे यांनी ही भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाली. चर्चेचा तपशील गुलदस्त्यात असला तरी काही दिवसांपूर्वी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज राज ठाकरे यांच्या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
विधानसभा निवडणुकांत मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने परस्परपूरक भूमिका घेतली होती. निवडणुकांआधी मनसेला आघाडीत सहभागी करून घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता, मात्र कॉंग्रेसने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.आता भविष्यात जर भाजपाची कोंडी करायची असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे असेच चित्र विधानसभा निकालांतून दिसून आले आहे.
भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा समिकरणाचीही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीला महत्व आले आहे.