मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यातच आता राज ठाकरे उद्या हनुमान जयंतीला पुण्यात असतील हे स्पष्ट झाले आहे. पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार असल्याचे पोस्टर लागले आहेत. त्याहून जास्त या पोस्टरची पुण्यात आणि सोशलमिडीयावर मोठी चर्चा सुरु झाली आहे. पुण्यातील महाआरती म्हणजे राज ठाकरेंच्या भोंग्याविरोधातील आंदोलनाची सुरुवात असल्याचे म्हटले जात आहे.
राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला असल्याने येत्या हनुमान जयंतीला ते काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता होती. मात्र याबद्दल आता स्पष्टता झाली आहे. पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार असून सामूहिक हनुमान चालिसा पठण केले जाणार आहे. संध्याकाळी ६ वाजता ही आरती होणार आहे. महत्वाचे म्हणजे या पोस्टरवर राज ठाकरेंचा उल्लेख ‘हिंदुजननायक’ असा करण्यात आला आहे.
राज ठाकरे पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. आज संध्याकाळी ते पुण्यात पोहोचणार आहेत. यानंतर शनिवारी मंदिरात ही महाआरती होणार असून त्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत.
मुंबईतील गुढीपाडव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर ठाण्यात उत्तरसभा घेत होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं होतं. यावेळी त्यांनी भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंतचे अल्टिमेटम दिले होते. त्यामुळे मुंबई, ठाण्यानंतर आता राज ठाकरेंनी आपला मोर्चा पुण्याकडे वळवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.