मुंबई – अभिनेत्री केतकी चितळे ही सोशल मीडियातील पोस्टमुळे सतत वाद आणि चर्चेत येत असते. केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिले आहे. यावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून तिच्यावर सडकून टीका केली जात आहे. तर या विखारी टीकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मात्र आता राज ठाकरेंचा केतकीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रक काढून केतकीच्या वादग्रस्त पोस्टवर संताप व्यक्त केला होता. पत्रकात राज ठाकरे म्हणले की, कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.
दरम्यान राज ठाकरे यांचा केतकीसोबत फोटो व्हायरल झाला असून नेटकरी राज ठाकरेंना सवाल करत आहे. कोणतरी नाही, ही केतकी चितळे, असं म्हणत फोटो शेअर करण्यात येत आहे. फोटोमध्ये केतकी राज ठाकरेंना राखी बांधतांना दिसत आहे.
पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचं असल्याचं राज ठाकरे यांनी पत्रकात म्हटलं होतं.