#LIVE: भाजपाला खोटं बोलण्याचा रोग लागलाय- राज ठाकरे

मुंबई : भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की माझ्या शापाने हेमंत करकरे गेले. अतिरेक्यांशी लढताना जे शहीद झाले, त्यांच्याबद्दल बोलताना काही वाटत नाही? आणि ह्यावर पुढे जाऊन नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे साध्वी प्रज्ञा ह्यांच्या विधानाचं समर्थन करतात? जेंव्हा ह्यावर टीका सुरु झाली तेंव्हा भाजपने हात झटकत सांगितलं की हे विधान आम्हाला मान्य नाही.. मग त्यांना तिकीट का दिलं? असा सवाल मनसे राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

राज्यातील काही भाग पिंजून काढल्यानंतर आज राज ठाकरे यांची सभा भांडुप येथे होत आहे, यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, हेमंत करकरे ज्या प्रकरणाचा तपास करत होते तो बॉम्बस्फोटाचा खटला होता आणि दहशतवादाला धर्म असूच शकत नाही. आणि अशा माणसाबद्दल विधान करणाऱ्यांना तुम्ही तिकीट देता. हा सत्तेचा माज आहे, अशी घणाणाती टीका त्यांनी भाजप सरकारवर केली.

राज ठाकरे यांच्या सभेतीत काही महत्वाचे मुद्दे –

 • कालच्या शिवडीच्या सभेतला एक विषय अर्धवट राहिला. काल मी एक फोटो दाखवला ज्यात भाजपच्या समर्थक फेसबुक पेजने त्या कुटुंबाचा फोटो वापरला. हे दाखवताना त्यांनी म्हणलं आहे की मोदींच्या कार्यकाळात हे कुटुंब गरिबी रेषेच्या बाहेर आले. हे कुटुंब आहे योगेश चिले, मुर्त्या बनवतो, व्यवसाय आहे.
 • ह्या योगेश चिलेंचे वडील बेस्ट मधून निवृत्त झालेत, तसंच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा सहचिटणीस आहे आणि रस्ते आस्थापन विभागाचा पदाधिकारी आहे. काल शिवडीच्या सभेनंतर भाजपच्या आयटीसेलच्या लोकांनी ते फेसबुक पेज गायब केलं, मग ती पोस्ट काढली आणि पुन्हा ते पेज सुरु केलं
 • योगेश हा मनसेचा पदाधिकारी आहे, त्याने टाकलेला कुटुंबाचा फोटो भाजपने जाहिरातीसाठी वापरला.
 • भाजपाला खोटं बोलण्याचा रोग लागलाय
 • प्रज्ञासिंग ठाकूर जे बोलल्या, त्याचं समर्थन मोदींनी आणि अमित शाहांनी केलं. जेंव्हा ह्यावर टीका सुरु झाली तेंव्हा भाजपने हात झटकत सांगितलं की हे विधान आम्हाला मान्य नाही.. मग त्यांना तिकीट का दिलं?
 • सरकारच्या योजनांच्या जाहिरातींवर साडेचार हजार रुपये कोटी खर्च केले. लोकांना नोकऱ्या देत नाही, एकही नवीन उद्योग उभा करता आला नाही आणि निव्वळ जाहिरातींवर खर्च करून लोकांना फसवायचा प्रयत्न करता?
 • नमामि गंगेच्या प्रकल्पासाठी २० हजार कोटी राखीव केले. गंगा साफ केलीच नाही, फक्त घाट बांधले म्हणजे गंगा साफ झाली असं होत नाही.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी जे गाव दत्तक घेतले, त्या गावाची अवस्था भीषण आहे, नाले ओसंडून वाहत आहेत, नाल्यातील पाणी विहिरीत जातं आणि त्यामुळे अशुद्ध पाणी प्यावं लागतं , एटीएम नाही, ग्रामपंचायतीचं कार्यालय नाही, गावातील लोकं उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत.
 • नरेंद्र मोदींच्या जन्मगावात, वडनगरमध्ये धड शौचालयं नाहीत, गटारं ओसंडून वाहत आहेत, महिलांना उघड्यावर शौचालय जावं लागतं. महिला ओरडून सांगत आहेत की गावात शौचालयं बांधा. मोदी ज्या गावातून आले त्या गावाची ही जर स्थिती असेल तर देशाची स्थिती काय असेल?
 • मोदींनी ५ वर्ष फक्त पंडित नेहरू, इंदिरा गांधींना शिव्या देण्यात घालवली. ह्या पलीकडे मोदींनी देशासाठी काहीच केलं नाही.
 • आधीच्या सरकारच्या काळात गॅस सिलेंडरचे भाव वाढले तर भाजपच्या लोकांनी गॅस सिलेंडर रस्त्यावर फेकले. काँग्रेसच्या काळात गॅस ४१० रुपयाला मिळत होता. आज त्याची किंमत ८०० रुपयांपर्यंत गेली आहे.
 • उज्वला गॅस योजनेत ज्या महिलेला गुड्डी देवी ह्यांना स्वतः ह्या योजनेतील पहिला गॅस दिला. पण पहिल्या सिलेंडरच्या नंतर त्यांना दुसरा सिलेंडर घेणं परवडणं शक्य नाही कारण सिलेंडरच्या किंमती अव्वाच्या सव्वा आहेत. ही परिस्थिती देशभर आहे
 • विरोधी पक्षात असताना दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ असं मोदी म्हणाले होते. म्हणजे ५ वर्षात १० कोटी लोकांना नोकऱ्या देणार होते. प्रत्येक कुटूंबात ४ माणसं गृहीत धरली तर साधारणपणे ४० कोटी लोकांचं आयुष्य बदलून गेलं असतं. पण ह्यांनी काहीच केलं नाही फक्त खोटी स्वप्न दाखवली
 • नोटबंदी आणि जीएसटीमुळे साडेचार ते पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कल्पना करा किती लोकांचं आयुष्य उध्वस्त झालं असेल ह्या निर्णयामुळे. नोटबंदीच्या वेळेस मला फक्त ५० दिवस द्या, सगळं सुरळीत करून दाखवतो असं म्हणणारे पंतप्रधान आज ह्या विषयावर गप्प का बसलेत?
 • पुलवामा येथे दहशतवादी हल्ला होऊ शकतो ह्याची पूर्वसूचना होती. तरीही काश्मीरचे राज्यपाल म्हणाले की हे गुप्तचर यंत्रणांचं हे अपयश आहे? पूर्वसूचना मिळून देखील का नाही काळजी घेतली? संपूर्ण देश दुःखात असताना मोदी रंगबेरंगी कपड्यात, चेहऱ्यावर हसू घेऊन फिरत होते.
 • मी कोत्या मनाचा माणूस नाही. चांगलं काम केलं असतंत तर मी कौतुक केलं असतं पण जर चुकलात तर हा राज ठाकरे तुम्हाला प्रश्न विचारणारच
 • मी काश्मीरला गेलो होतो, शिकाऱ्यातून फिरून आलो तेंव्हा ती लोकं मला भेटायला आली म्हणाली की तुमच्या शब्दाला वजन आहे, तुम्ही तुमच्या लोकांना सांगा की काश्मीर मध्ये पर्यटनाला या अन्यथा आम्ही उपाशी मरू. काश्मिरी माणसाला शांतता हवी आहे पण ह्या भाजपाला अशांततेचं राजकारण करायचं आहे
 • बालाकोट येथील हल्ल्यानंतर किती माणसं मारली गेली ह्याचा तपशील आमच्याकडे नाही असं एअरचीफ मार्शल सांगत होते, मग अमित शाह ह्यांनी २५० माणसं मारली हा आकडा कुठून पैदा केला?
 • बालाकोट हल्ल्याचं,पुलवामा घटनेचं राजकरण करून नरेंद्र मोदी निर्लज्जपणे नव-मतदारांना आवाहन करत आहेत की तुम्ही तुमचं मत पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांसाठी आणि बालाकोटच्या एअरस्ट्राईकच्या शौर्यसाठी का नाही मतदान करू शकत? बरं हेच मोदी म्हणतात की व्यापारी हा सैनिकांपेक्षा अधिक शूर असतो
 • माझ्या प्रश्नांची उत्तरं भाजप का देत नाही?
 • किरीट सोमय्यांनी व्होटिंग मशीनमध्ये घोळ आहे असं २०१४ च्या सांगितलं होतं, हेच किरीट सोमय्या हातात पट्टी घेऊन रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची उंची मोजत होते, पण २०१४ नंतर किरीट सोमय्या ह्या विषयवार बोलायला तयार नाही.
 • मी २०१४ च्या आधी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे वाभाडे काढले तेवढे भाजपवाल्यानी देखील काढले नव्हते, आधीचे नालायक आहेत असं वाटलं तर हे त्यांच्याहून अधिक नालायक निघाले
 • रेल्वे अपघातात दिवसाला ९ माणसं मृत्युमुखी पडतात, अशाच एका अपघातात इथली स्थानिक मुलगी मोनिका जिचे दोन्ही हात गेले, मला सांगा काय करायचं ह्या मुलीने आयुष्यभर? कोण जबाबदार आहे ह्याला?

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.