Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज डोंबिवलीत पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या नावापुढचे हिंदूहृदयसम्राट काढून टाकल्याची टीका केली.
काही ठिकाणी बाळासाहेबांच्या नावापुढे जनाब लावल्याने देखील राज ठाकरे यांनी टीका केली. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीकास्त्र सोडले. यानंतर राज्यातील गेल्या काही वर्षांपासूनच्या राजकीय घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली.
तसेच, त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर देखील भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, “शिवसेना, भाजपा यांच्यासमोर काँग्रेस आण राष्ट्रवादीचं आव्हान होतं.
2019 ला निवडणुका झाल्या, मग निकाल लागले आणि सकाळचा शफथविधी झाला. 15 मिनिटात ते लग्न तुटलं, कारण काकाने डोळे वटारले. मग लगेच घरी आले काका मला माफ करा,” असा टोला राज ठाकरेंनी अजित पवारांना लगावला.
“मग ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या होत्या त्या काँग्रेस, राष्ट्रवादीसह उद्धव ठाकरे जाऊन बसले. मला अमित शाह यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची हमी दिली होती असं त्यांचं म्हणणं होतं. हे चार भिंतीत झालं होतं.
पण उद्धव ठाकरेंसमोर व्यासपीठावर असताना नरेंद्र मोदींनी फडणवीस पुढील मुख्यमंत्री असतील असं सांगितलं होतं. अमित शाह यांनीही फडणवीसांचं नाव घेतलं तेव्हा आक्षेप का नाही घेतला? मला शब्द दिला आहे, मग त्यांचं एकट्याचं नाव का घेत आहात असं विचारलं का नाही.
निकाल लागेर्यंत कोणी काही बोलेना, 2019 चा निकाल लागल्यावर आपल्याशिवाय सरकार होणार नाही लक्षात येताच बोलायला सुरुवात केली की मुख्यमंत्रीपद द्या, अन्यथा जातो”, असं राज ठाकरे म्हणाले.