मुंबई: राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने जोरदार तयारी सुरू केली असून, यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्याची घोषणा केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
टीझरने वाढवला उत्साह –
गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने एक खास टीझर जारी केला आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या या एक मिनिटाच्या व्हिडीओत “गुढीपाडवा मेळावा २०२५” आणि “MNS Adhikrut” असं नमूद करण्यात आलं आहे. या टीझरमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, राज ठाकरेंच्या मोठ्या घोषणेची प्रतीक्षा वाढली आहे.
टीझरमध्ये काय आहे?
या व्हिडीओत राज ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या १९व्या वर्धापन दिनाच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत. “निछड्या छातीचा मराठी अभिमान” आणि “अभेद्य एकजूट” असे प्रेरक शब्द ऐकायला मिळतात. त्याचबरोबर, “मी येत्या ३० तारखेला बोलणार आहे. जल्लोषात, गुलाल उधळत सर्वांनी शिवतीर्थावर यावं,” असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. व्हिडीओच्या शेवटी “या गुढीपाडव्याला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गुढी उभारू!!” असा संदेश देण्यात आला आहे.
#गुढीपाडवामेळावा२०२५#MNSAdhikrut pic.twitter.com/1H2TV5ZFOO
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 24, 2025
राज ठाकरे काय बोलणार?
मनसेचा १९ वा वर्धापन दिन नुकताच चिंचवडमध्ये साजरा झाला. त्या वेळी राज ठाकरे यांनी “मी ३० तारखेला बोलणार” असं जाहीर केलं होतं. आता गुढीपाडवा मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना, राज ठाकरे या मंचावरून नेमकं काय सांगणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. विशेषतः महापालिका निवडणुकांच्या संदर्भात ते कोणती मोठी घोषणा करणार का, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
निवडणूक तयारी जोरात –
महापालिका निवडणुकांची चाहूल लागताच मनसेने आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. गुढीपाडवा मेळावा हा त्याच दृष्टीने महत्त्वाचा मानला जातोय. राज ठाकरे यांच्या भाषणातून पक्षाची पुढील दिशा आणि निवडणूक रणनीती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मेळावा मनसेच्या कार्यकर्त्यांसह राजकीय निरीक्षकांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. गुढीपाडव्याच्या या मेळाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा टर्न येणार का, हे लवकरच कळेल!