राज ठाकरेंनी झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे -रामदास आठवले

नाशिक : मनसे आणि भाजप एकत्र येऊन कोणालाही फायदा होणार नाही. राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, अशी सूचना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मनसेचे आज महाअधिवेशन होणार आहे त्या पार्श्‍वभूमीवर आठवले यांनी केलेले हे वक्‍तव्य महत्वाचे ठरणार आहे.

आठवले यांनी नागरिकत्व कायदा देशहिताचा असून कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी या कायद्याविरोधात मुस्लिमांमध्ये भीती उत्पन्न केली असल्याचा आरोपही केला. मुस्लिम समाजाला बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. मात्र हा कायदा योग्यच आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

इंदू मिलच्या जागेवर स्मारकच व्हावे, तो निधी स्मारकासाठी वापरला जावा. केंद्र तसेच राज्य सरकारने वाडिया रुग्णालयास भरघोस मदत करावी, परंतु त्यासाठी इंदू मिलचा निधी वापरू नये, अशी सूचना आठवले यांनी केली.

मुंबई चोवीस तास संकल्पनेलाही त्यांनी विरोध केला. या संस्कृतीमुळे महिलांची सुरक्षितता धोक्‍यात येईल. तसेच समाजकंटकांना रान मोकळे मिळेल. यापेक्षा रात्री उशीरापर्यंत म्हणजे 12 वाजेपर्यंत मुंबई धावती असावी. महामार्गनजीक हॉटेल सुरू रहावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.