शिवसेना भवनासमोर मनसेची पोस्टरबाजी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) शिवसेना भवनसमोर पोस्टरबाजी करण्यात आली आहे. राज ठाकरेंचा महाराष्ट्र धर्म सम्राट असा उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारीला जयंती असून मुंबईत मनसेचे अधिवेशन होणार आहे. त्याआधी मनसेकडून मुंबईत पोस्टरबाजी करण्यात आल्याचे दिसत आहे. या पोस्टरवर सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट असे लिहिण्यात आले आहे. मनसेची पोस्टरबाजी महत्त्वाच म्हणजे या हे पोस्टर भगव्या रंगात असल्याने मनसे भाजपासोबत युती करण्याच्या तसेच भगवेकरण होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मा साठी एकच सम्राट pic.twitter.com/nH28n0JBwA
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 17, 2020
या पोस्टरसंबंधी बोलताना मनसेच्या सरचिटणीसांनी याविषयी माहिती दिली आहे. महाराष्ट्रावर जेव्हा कधी संकट आले आहे मग ते गोविंदा, गणेशोत्सव तसेच रजा अकादमीच्या गुंडांनी घातलेला दंगा असो तेव्हा राज ठाकरे आणि मनसे उभी राहिली आहे. तोच संदेश या पोस्टरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. यावेळी त्यांनी कोणालाही डिवचण्याचासाठी हे पोस्टर लावण्यात आले असून आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे असे स्पष्ट केले.
आम्ही महाराष्ट्र धर्माचे पालन करत आहोत. सत्तेसाठी सगळे येत आहेत, पण महाराष्ट्र धर्माचे पालन होताना दिसत नाही. महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. पोस्टर भगव्या रंगात असल्याने झेंड्याचा रंगही बदलणार का असे विचारण्यात आले असता संदीप देशपांडे यांनी झेंड्यासंबंधी कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. महाराष्ट्राचा उल्लेख असल्याने भगवा रंग वापरण्यात आला आहे. त्यासंबंधी अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील असे सांगितले.