मुंबई : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. या निवडणुकीत मनसेने एकला चलोचा नारा देत 128 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खालल्यानंतर राज ठाकरेंनी एक्सद्वारे केवळ तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. “अविश्वसनीय.. तुर्तास इतकेच”, असं म्हणत त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाविषयीची नाराजी उघड केली होती.
दरम्यान आज रमाकांत आचेरकर यांच्या स्मारकाचे अनावरण राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी “रमाकांत आचेरकर यांचं स्मारक याच्याआधीच व्हायला हवं होतं. आचरेकर सरांनी जेवढे खेळाडू भारतासाठी तयार केले तेवढ्या इतर कोणत्या कोचने केले असतील, असं मला वाटत नाही. खरंतर रस्ते, फ्लायओव्हरसाठी अशा लोकांची नावे दिली पाहिजेत. आज क्रिकेट जसं बदललं. तसं सगळ्याच गोष्टी बदलल्या. आजही नवीन मुलं सांगतात की आम्हाला सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळींसारखं खेळता येत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.
“तुमच्याकडे क्रिकेट बदलत गेलं, तसं आमच्याकडे राजकारण बदलत गेलं. तुमच्याकडे अम्पायरने आऊट दिल्यावर थर्ड अम्पायर असतो. गेल्या निवडणुकीत आम्हाला थर्ड अम्पायर दिला असता तर निर्णय बदलले असते, वेगळे दिसले असते”, अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.