मुंबई – विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्यांसह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. यातच आता मनसे सैनिकांनी मनसे स्टाईल यावर उपाय काढला आहे.
मिळालेल्या माहिती माहितीनुसार, मनसेचे सरचीटणीस नयन कदम यांनी खास राज ठाकरेंच्या रक्षणासाठी ही टीम तयार केली आहे. त्यांनी वृत्तमाध्यमांशी बोलतांना सांगितले की,’राज ठाकरेंच्या रक्षणासाठी ही टीम तयार केली आहे. ‘
दरम्यान, राज्य सरकारने 10 जानेवारीला राज्यातील भाजपचे बडे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या कपातीचा निर्णय घेतला. फडणवीस यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा होती. त्याऐवजी, त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येईल. फडणवीस यांच्या पत्नी अमृता आणि त्यांची कन्या दिविजा यांना वाय प्लस विथ एस्कॉर्ट दर्जाची सुरक्षा होती. ती आता एक्स दर्जाची करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना वाय प्लस ऐवजी वाय दर्जाची सुरक्षा देण्यात येईल.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना झेड ऐवजी वाय प्लस विथ एस्कॉर्ट सुरक्षा पुरवण्यात येईल. भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगुंटीवार यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली. राणे यांना यापुर्वी वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्थ होती. या शिवाय राज्याचे लोकायुक्त एम. एल. तहिलिआनी यांची सुरक्षा व्यवस्था झेडवरून वाय दर्जाची करण्यात आली.