पुणे – महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून दररोज ५० हजार रुग्ण आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र येत्या रविवारी (ता. 11) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे. या परीक्षेला राज्यात ४ लाखाहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत. मात्र करोनाची स्थिती पाहता विद्यार्थ्यांनाच रविवारी होऊ घातलेली परीक्षा नकोय.
याच संदर्भात आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून एमपीएससीच्या परीक्षेबाबत चर्चा केली. यावेळी राज ठाकरे यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली आहे. राज ठाकरेंच्या या मागणीला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एमपीएससीच्या परीक्षेबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, देशभरात करोना स्फोट होताना दिसत आहे. करोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णसंख्येचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरूवारी एकूण १.३१ लाख नवीन करोना रुग्णांची भर पडली. तर ८०० जणांचा मृत्यू झाला. देशात करोना आल्यापासून आतापर्यंतची ही सर्वात मोठा वाढ असल्याचे म्हटले जात आहे.