मुंबई – दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सध्याचे राज्यातील वातावरण पाहता राज ठाकरे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्षावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरेंनी आपण पाडवा मेळाव्यात सविस्तर बोलणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर सर्वांनाच राज ठाकरे नेमक काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे.
मात्र, अश्यातच मनसेने ठाकरे गटाला डिवचल्याचं दिसून आलं आहे. मनसे कडून आज शिवसेना भवन आणि दादर परिसरात प्रचंड बॅनरबाजी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये राज ठाकरे यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून, हे पोस्टर राजकारण तापणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, मनसेकडून करण्यात आलेल्या या पोस्टरबाजीवर आता ठाकरे गटाकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मनसेच्या या मन की बातवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते माध्यमांशी सवांद साधत होते. संजय राऊत म्हणाले,”या देशात लोकशाही आहे. या देशात सामान्य नागरिक पंतप्रधान आणि मुख्यमंत्री होऊ शकतो.
आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. तुमच्याकडे बहुमत असेल तर तुम्ही त्या पदावर जाऊ शकता. शेवटी हा आकड्यांचा खेळ आहे. बहुमत नेहमी चंचल असतं. आज आमच्याकडे असेल तर उद्या दुसऱ्याकडे. त्यामुळे बहुमताच्या खेळावर अवलंबून राहू नये.’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
बॅनरमध्ये राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख…
शिवसेना भवनासमोर लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये महाराष्ट्रातील जनतेचे भावी मुख्यमंत्री… हिंदूंचे लोकनेते राजसाहेब ठाकरे… हा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॅनरवर राज ठाकरे यांचा मोठा फोटो आहे. भगवी शाल अंगवार पांघरलेला राज ठाकरे यांचा हा फोटो आहे. आणि खाली लक्ष्मण पाटील यांचाही फोटो आहे.