#LIVE: सत्ता आणि पैशासाठी शिवसेना-भाजप एकत्र : राज ठाकरे

रायगड:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रायगड येथे जाहीर सभा घेतली. ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात नांदेड, सोलापूर, इचलरंजी, सातारा आणि पुण्यात जाहीर सभा घेतल्या आहेत. त्यानंतर पाचवी सभा आज रायगड येथे पार पडली. ठाकरे यांनी या पूर्वीच्या आपल्या चारही सभांमध्ये केंद्रशासन तसेच राज्यशासनाच्या कारभाराची चिरफाड केली आहे.

राज ठाकरेंच्या सभेतील ठळक मुद्दे

 • रायगड येथील सभेतील राजसाहेबांच्या भाषणाला सुरुवात
 • नाशिकला महापालिका निवडणुकांच्या वेळेस मी नाशिकमधल्या कामांचं सादरीकरण केलं होतं. तेंव्हापासूनच माझ्या डोक्यात होतं प्रचाराचं सादरीकरण असंच असायला हवं.
 • तुम्ही मागे काय घडलं, काय बोललं गेलं हे विसरून जाता म्हणून हे पुढारी तुम्हाला गृहीत धरतात
 • नाणार प्रकल्प रद्द झाल्यावर त्यातील आंदोलक भेटले होते. तेंव्हा मी त्यांना सांगितलं की बेसावध राहू नका कारण हे निवडणुकांपुरत प्रकल्प रद्द केल्यासारखं दाखवतील आणि पुन्हा डोकं वर काढतील
 • शिवसेना-भाजपने एकमेकांना यथेच्छ शिव्या दिल्या आणि पुन्हा युती केली कारण दोन्ही पक्ष लाचार आहेत. पैसे आणि सत्ता ह्यासाठी ते वाट्टेल त्या तडजोडी करतील
 • कोकण आणि केरळ ह्यांच्यात भौगोलिक साम्य आहे. कोकण तर केरळपेक्षा खूप जास्त सुंदर आहे. केरळ पर्यटनात कुठे गेलं आणि कोकण मागेच राहिला तरीही ह्याचं इथल्या लोकप्रतिनिधीना काही घेणं देणं नाही. कोकणाची पर्यटनाची क्षमता इतकी अफाट आहे की इथले तीन जिल्हे आख्ख्या महाराष्ट्राची काळजी घेऊ शकतं
 • गेले ५ वर्ष हा देश नरेंद्र मोदी आणि अमित शाह चालवत आहेत आणि अगदीच तोंडदेखलं अरुण जेटलींना बोलवतात. नोटबंदीसारखा आततायी निर्णय लहरीपणातून घेतला. काय केलं मोदींनी? काँग्रेसच्या योजनांची नावं बदलली आणि त्याच योजना पुढे रेटल्या. हेच मोदींच कर्तृत्व
 • वैमानिक अमोल यादवला मेक इन इंडियात त्याने इथे व्यवसाय सुरु करावा म्हणून महाराष्ट्र सरकारने वारेमाप आश्वासन दिली, शेवटी त्याला सरकारी यंत्रणेने इतकं जेरीस आणलं की हा मुलगा आता अमेरिकेत एका कंपनीबरोबर हा व्यवसाय सुरु करतोय
 • नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांना ५ वर्षात नक्की काय साधायचं होतं? नोटबंदीतून जर काळा पैसा बाहेर काढायचा होता तर मग भाजपकडे निवडणुका लढवायला जो वारेमाप काळा पैसा आलाय तो आला कुठून?
 • रिझर्व बँकेच्या नुकत्याच आलेल्या अहवालात असं सांगितलं गेलंय की नोटबंदीच्या आधी जितकं चलन बाहेत फिरत होतं त्याच्याहून जास्त चलन आत्ता बाहेर आलंय. मोदी नोटबंदीच्या दरम्यान म्हणाले होते, जर नोटबंदी फसलं तर मला भर चौकात शिक्षा द्या. आता मोदींनी सांगायचा कुठला चौक निवडायचा.
 • बिहार मध्ये नरेंद्र मोदी म्हणाले एका आठवड्यात साडेआठ लाख शौचालयं बांधली. खोटं बोलायला काही मर्यादा?
 • पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींनी काहीच केलं नाही म्हणून उठसुठ टीका करत रहायची. अरे जर नेहरू आणि इंदिरा गांधींनी जर काहीच केलं नसतं तर ज्या तांत्रिक प्रगतीच्या आधारावर खोटा प्रचार केला तो प्रचार करू शकले असते का?
 • मोदींनी खासदार म्हणून जे गाव दत्तक घेतलं त्यात काहीच घडलं नाही. गावात एकही सुविधा आली नाही. साधे नाले साफ नाही होऊ शकले ना महाविद्यालय ना दवाखाना आहे. स्वतः जे गाव दत्तक घेतलं ते जर तुम्ही नीट करू नाही शकलात तो माणूस ह्या देशाचं काय भलं करणार
 • जे जे १९३० ला हिटलरने जर्मनीत करायचा प्रयत्न केला तोच सगळा प्रकार नरेंद्र मोदी २०१४ पासून करायचा प्रयत्न करत आहेत. पण ते विसरले की सोशल मीडिया आता आहे जो तुम्हाला आरसा दाखवतो
 • देशातले धसई हे पहिलं कॅशलेस गाव आहे असं मोदींनी जाहीर केलं पण ह्या गावात एकच राष्ट्रीयकृत बँक आहे आणि ह्या गावात अनेकांचं बँक खातं नाही त्यामुळे त्यांचे सगळेच व्यवहार रोखीत होतात.
 • नरेंद्र मोदींकडे दाखवण्यासारखं काहीच उरलं नाही त्यामुळे आता पुलवामात शहीद जवानांच्या नावावर मतं मागत आहे. आजपर्यंत कधीच झालं नाही, की पाकिस्तनाचा पंतप्रधान, भारताचा पंतप्रधान कोण असावा ह्यावर बोलत आहेत.काय कारण आहे की इम्रान खान ह्यांना मोदी भारताचे पंतप्रधान व्हावेत असं वाटतं?
 • अटलजींच्या वेळेस पण कारगिल झालं होतं पण त्यांनी त्याचा कधी बाजार नाही मांडला जसा मोदी मांडत आहेत
 • ही निवडणूक देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार हे ठरवणारी आहे. म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांना राजकीय क्षितिजावरून हटवण्यासाठी मतदान करा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.