राज ठाकरेचं नांदेडमध्ये जल्लोषात स्वागत ; हजूर साहिब’ गुरुद्वाराला दिली भेट

नांदेड – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नांदेड मध्ये आगमन झालं आहे. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी रेल्वे स्थानकांवर पक्षाचे पदाधिकारी व मनसे सैनिकांकडून त्याचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

यादरम्यान, राज ठाकरेंनी नांदेडमधल्या प्रसिद्ध ‘हजूर साहिब’ गुरुद्वाराला भेट दिली. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक आहे.

संध्याकाळी पाच वाजता नांदेड शहरातील नवीन मुंडा मैदान, कृषी मार्केटसमोर राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात ते पहिली जाहीर नांदेडमध्ये घेत आहेत. त्यामुळे या सभेत त्यांच्या निशाण्यावर कोण असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सभेतून राज ठाकरे भाजपच्या विरोधात एल्गार पुकारतील, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. नांदेडमध्ये कॉंग्रेसचे अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रताप पाटील-चिखलीकर यांच्यात मुख्य लढत आहे.

दरम्यान,2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या मैदानातून माघार घेतली आहे. गुढीपाडव्यादिवशी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर तोफ डागत लोकसभा निवडणूकीत भाजपाविरोधात मतदान करा, अशी जाहिरपणे आवाहन केले होते. मेळाव्यात बोलताना भाजपचा पराभव करण्यासाठी राज्यभरात 10 ते 11 ठिकाणी सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांची पहिली सभा नांदेडमध्ये होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.