मुंबई : ‘वेदान्त फॉक्सकॉन’सह बरेच प्रकल्प परराज्यात गेल्याने महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. नवीन प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. राज्यात हे सर्व सुरु असताना अदाणी समुहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असणाऱ्या ‘शिवतीर्थ’ येथे ही भेट झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
गौतम अदाणी यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने राज्यात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. महाराष्ट्रात नवीन प्रकल्प आणण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली असावी, असा अंदाज लावण्यात येत आहे.
तर दुसरीकडे, धारावी डेव्हलपमेंटचा मुंबईमधील मोठा प्रोजेक्ट अदाणी यांच्या कंपनीला मिळाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी अदाणी हे राज्यातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत, असे सांगितले जात आहे.
पण गौतम अदाणी आणि राज ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. विशेष म्हणजे याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील एका कार्यक्रमालाही गौतम अदाणी यांनी हजेरी लावली होती. यानंतर आज अदाणी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.