राज ठाकरे आणि शरद पवारांचे स्क्रीप्ट ‘सेम टु सेम’ – विनोद तावडे यांची टीका

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषा सेम टु सेम आहे, त्यामुळे राज ठाकरे कोणाच्या स्क्रीप्टनुसार सध्या भाषणे करित आहेत हे आता वेगळे सांगायची गरज नाही, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले.

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना शरद व पवार व राज ठाकरे यांच्या भाषणांतील वक्तव्यांचा समाचार घेतला. या दोन्ही नेत्यांच्या वेगवेगळ्या जाहिर सभा झाल्या. पण या जाहिर सभांमधील भाषा मात्र एकच आहे. मोदी सरकार, भाजपची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली आहे, नरेंद्र मोदी हे शहीदांच्या नावावर मतं मागतात… हे शरद पवार पण बोलले आणि राज ठाकरे पण नेमके तेच बोलले. त्यामुळे जनतेलाही आता कळले असेल की, राज ठाकरे कोणाच्या स्क्रीप्टनुसार कसे काम करीत आहेत, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

बुधवारी राज ठाकरे यांनी आपल्या भांडूपमधील सभेत रेल्वे अपघातामधील मोनिका मोरे यांना व्यासपीठावर आणले होते, याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, ज्यावेळी त्यांचा अपघात झाला त्यावेळी त्या शिकत होत्या, त्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते. तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी संजय निरुपम यांच्यासोबत केईएम रुग्णालयात मोनिका मोरे यांना भेटायला गेल्या. पण त्यावेळी कॉंग्रेस सरकारने काहीही केले नाही. पण खासदार किरीट सोमय्या यांनी आर्टीफीशिल ऑर्गनच्या माध्यमातुन मोनिका मोरे यांना सर्व प्रकारची मदत विविध ट्रस्टमार्फत मिळवून दिली. कॉंग्रेसने मात्र त्यावेळी काही केले नाही आणि आता उलट राज ठाकरे हाच प्रश्न किरीट सोमय्यांना विचारत आहेत. पण राज ठाकरे यांना हाच प्रश्न कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला का विचारता येत नाही? असा सवाल करीत “त्यांना विचारायला तुम्हाला लाज वाटते का?’ असा टोलाही तावडे यांनी लगावला.


अभिनंदन आणि कुलभूषण जाधव…
भारतीय हवाई दलाचे स्कॉर्ड्रन अभिनंदन वर्थमान यांची सुटका जिनिव्हा करारामुळे झाल्याचे शरद पवार म्हणत असतील तर मग कुलभूषण जाधव यांची सुटका जिनिव्हा करारामुळे का नाही झाली ? जर कुलभुषण जाधव यांची सुटका होत नसेल तर अभिनंदन यांची पण झाली नसती, असे तावडे म्हणाले. अभिनंदन यांची सुटका होण्यासाठी भारताने विशेष प्रयत्न केले, तसेच विशेष आंतरराष्ट्रीय दबाव हा मोदी सरकारने आणल्यामुळे अभिनंदन यांची सुटका झाली. हे पवार का मान्य करत नाही. कुलभूषण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार प्रयत्न नक्की प्रयत्न करत आहे, पण कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून दिली जाणारी फाशी थांबवून आंतराष्ट्रीय कोर्टात आपण ती बाजू भक्कमपणे लढत आहोत. हे मोदी सरकारचे मोठ यश आहे. हे शरद पवार यांना दिसत नाही का, असा सवालही तावडे यांनी यावेळी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.