मुंबई -अश्लील चित्रपट बनवल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेला मुंबईतील व्यावसायिक राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार रेयान थोर्प यांनी आपल्यावरील कारवाईला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली होती, ती याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.
कुंद्रा व थोर्प यांना गेल्या महिन्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. संबंधीत आरोपींची न्यायालयीन कोठडी कायम ठेवण्याचा मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निर्णय योग्य असून
त्यात हस्तक्षेप करण्याची गरज आम्हाला वाटत नाही, असे हायकोर्टाने आपल्या निकाल पत्रात नमूद केले आहे. आपल्यावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर आहे असे त्यांनी म्हटले होते.
सीआरपीसीच्या कलम 41 अ अंतर्गत आपल्यावर कारवाई करण्यापुर्वी आपल्याला नोटीस जारी करणे आवश्यक होते, पण ते पोलिसांनी केले नाही त्यामुळे आपल्यावरील कारवाई रद्द करावी अशी कुंद्रा व त्याच्या साथीदाराची मागणी होती.
तथापि सुनावणीच्यावेळी पोलिसांनी सांगितले की तशी नोटीस त्यांच्यावर जारी करण्यात आली होती; पण त्यांनी ती स्वीकारली नाही. आपल्या न्यायालयीन कोठडीलाही त्यांनी आव्हान दिले होते. पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली.