मुंबई – पॉर्न मूव्हीज प्रकरणात राज कुंद्राला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा शिल्पा शेट्टीला समन्स बजावणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता,
पण शिल्पाने राज कुंद्राच्या वियान इंडस्ट्रीजमधून काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. शिल्पा बहुतेक व्यवसायांत कुंद्राची भागीदार आहे.
कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी हिचीदेखील पोलिसांकडून चौकशी केली गेली आहे. पोलिसांनी शिल्पाला पोलीस ठाण्यात बोलावले नव्हते, परंतु शुक्रवारी गुन्हे शाखेची एक टीम तिच्या घरी पोहोचली होती. पोलिसांनी यावेळी राज कुंद्रालाही सोबत नेले होते आणि सुमारे 6 तास कुंद्रा आणि शिल्पाला एकत्र बसून चौकशी केली गेली. शिल्पाला कंपनीकडून किती फायदा झाला याचा गुन्हे शाखा शोध घेत आहे.
राज कुंद्राचे ऍडल्ट ऍप हॉटशॉट्स आणि त्यातील कटेंटविषयीची पूर्ण माहिती शिल्पाला होती. या ऍपमधून होणाऱ्या कमाईमधील मोठी रक्कम अनेकदा शिल्पाच्या बॅंक खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती असे मानले जाते आहे.
त्यामुळे शिल्पाही आता मुंबई पोलिसांच्या रडारवर आहे. या प्रकरणात शिल्पाचा किती सहभाग आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेची टीम करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोबतच शिल्पाला कंपनीच्या पैशांचा काही फायदा झाला का, याची चौकशीही गुन्हे शाखेची टीम करीत आहे.
शिल्पाच्या बॅंक खात्यांची चौकशीही गुन्हे शाखेकडून केली जात आहे. या व्यतिरिक्त शिल्पा शेट्टीने ‘वियान इंडस्ट्रीज’च्या डायरेक्टर पदावर किती दिवस काम केले याचा शोध घेण्याचा प्रयत्नही गुन्हे शाखा करत आहे. चौकशीसाठी पोलिस पुन्हा शिल्पाशी संपर्क साधू शकतात.
ऍप्ससाठी डिजिटल कंटेंट होस्ट करणा-या सर्व्हरमधील डेटा डिलीट करणा-या व्यक्तीचादेखील शोध घेतला जात आहे. राज कुंद्राच्या खात्यात सट्टेबाजीशी संबंधित कंपनीकडून पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम डिलीट केलेला डेटा रिस्टोअर करण्याचा देखील प्रयत्न करीत आहे.
शिल्पा म्हणते इरॉटिका म्हणजे पॉर्न नाही
इरॉटिका म्हणजे पॉर्न नसते आणि आपला पती राज कुंद्रा पॉर्न साहित्याच्या निर्मितीत सहभागी नव्हता असे शिल्पाने म्हटले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हॉटशॉटशी आपला संबंध नव्हता आणि त्याची आपल्याला माहितीही नव्हती, असा दावाही तिने केला आहे. राज कुंद्राचा लंडन येथील मेहुणा प्रदीप बक्षी संबंधित ऍपचे काम पाहत होते व राज निर्दोष असल्याचेही तिने म्हटले आहे.