14 डिसेंबर 1924 रोजी राज कपूर यांचा जन्म झाला. यंदाचं वर्ष हे या शोमनच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. त्यांनी आपल्या आयुष्याच्या घटनांवर अनेक पटकथा लिहिल्या आणि चित्रपटासारखे ‘लार्जर दॅन लाइफ’ आयुष्यदेखील जगले.
‘शो’मॅन राज कपूर म्हणजे भारतीय सिनेसृष्टीला पडलेलं सोनेरी स्वप्न. निळ्याशार डोळ्यांचा, विलक्षण प्रतिभा असणारा, दूरदृष्टी असणारा, संवेदनशील आणि अफाट अभिनयक्षमता, निर्मिती-दिग्दर्शनाचे कौशल्य असणारा जगावेगळा कलावंत. चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेते, चित्रपट निर्माते असणार्या राज कपूर यांनी आपल्या अभिनय कौशल्याने सर्व रसिक प्रेक्षकांना केवळ प्रभावितच केले नाही तर अंतर्मुखही केले आणि स्वप्नांच्या नव्या दुनियेची सङ्गरही घडवून आणली. सिनेसृष्टीला त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे.
अलीकडेच इफी 2024 च्या निमित्ताने राज कपूर यांचा नातू रणबीर याने आपल्या मुलाखतीत लाडक्या दादूंविषयी बोलताना अतिशय मार्मिक विवेचन केले. तो म्हणाला, ‘राज कपूर यांचे चित्रपट सामाजिक समस्यांंवर भाष्य करणारे होेते तसेच सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करणारेही!’ ‘आवारा’मध्ये जातीवादाचा मुद्दा मांडला गेला; तर ‘श्री 420’ मध्ये त्यांनी वंचितांच्या संघर्षावर लक्ष केंद्रित केले. ‘राम तेरी गंगा मैली’मध्ये महिलेच्या व्यक्तिमत्त्वाच्या शुद्धतेचे आणि पवित्रतेचे दर्शन त्यांनी घडवले होते. 50 वर्षांपूर्वी बनलेल्या चित्रपटांमध्येही, राज कपूर यांनी जे कथानक मांडले ते आजच्या पिढीलाही प्रेरित करणारे आहे तसेच वर्तमान समस्यांशी निगडीत आहे.
रणबीरने व्यक्त केलेले मनोगत अतिशय समर्पक आहे. राज कपूर यांनी आपल्या शानदार कारकिर्दीत ‘बरसात’, ‘श्री 420’, ‘संगम’, ‘आवारा’ यांसारख्या एकाहून एक सरस चित्रपटांमधून बॉलीवूडपटांना खर्या अर्थाने सिनेमॅटिक चमक दिली. 1951 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारा’ या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.
राज यांच्यावर चार्ली चॅपलीनचा विलक्षण प्रभाव होता. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनयामध्ये चेहर्यावरील हावभाव किती महत्त्वाचे असतात आणि त्यंाच्या आधारे किती सार्थपणाने भावना व्यक्त करता येतात याचा वस्तुपाठच जणू राज कपूर यांनी घालून दिला. ‘मेरा नाम जोकर’ सारख्या चित्रपटातील त्यांची भूमिका असेल किंवा ‘आवारा’मधील त्यांचा अभिनय असेल; प्रत्येक प्रसंगातील उत्कटता त्यांनी तितक्याच ताकदीने आपल्या हावभावातून मांडत प्रेक्षकांची मने जिंकली. ‘दोस्त दोस्त ना रहा’ हे गाणं पाहताना त्या व्यक्तिरेखेच्या मनातलेे भाव, त्याला झालेलं प्रेमभंगाचं दुःख, फसवलं गेल्याची भावना हे सारे मनपटलावरील तरंग त्यांनी अप्रतिमपणाने सादर केले.
त्यांनी 1930 च्या दशकात बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये आपला प्रवास सुरू केला. पृथ्वीराज कपूर आणि रामसरणी देवी कपूर यांच्या सहा मुलांमध्ये राज हे सर्वांत थोरले. 1935 मध्ये आलेल्या ‘इन्कलाब’ या हिंदी चित्रपटात ते पहिल्यांदा दिसले. त्यावेळी त्यांचे वय अवघे दहा वर्षे होते. 1949 मध्ये आलेल्या ‘नीलकमल’ मध्ये मधुबालासोबत मुख्य भूमिकेत झळकल्यानंतर त्यांना मोठा ब्रेक मिळाला. यानंतर मेहबूब खानच्या ‘अंदाज’ चित्रपटामध्ये दिलीपकुमार आणि नर्गिससोबत काम केले. अभिनेता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट. निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून त्यांना पहिले यश ‘बरसात’ या चित्रपटाने मिळाले.
1970 मध्य आलेल्या ‘मेरा नाम जोकर’ची निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्हींची जबाबदारी त्यांनी लीलया पेलली. हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी सहा वर्षांहून अधिक काळ लागला. त्यांचा मुलगा ऋषी कपूर याने या चित्रपटात त्यांच्या पात्राची तरुणपणीची भूमिका साकारून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आरके स्टुडिओचा ‘मेरा नाम जोकर’ 244 मिनिटांचा होता. दोन इंटरव्हल्सचा हा पहिलाच चित्रपट होता. बॉक्स ऑङ्गिसवर अयशस्वी ठरला असला तरी, नंतर तो भारतीय चित्रपटसृष्टीद्वारे निर्मित सर्वात प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक बनला. राज कपूर यांनी अनेक तंत्रज्ञांसोबत काम केल्यानंतर वयाच्या 24 व्या वर्षी 1948 मध्ये आरके स्टुडिओची स्थापना केली.
राज कपूर यांचे खरे नाव रणबीर राज कपूर. केदार शर्मा दिग्दर्शित ‘विषकन्या’च्या सेटवर क्लॅप-बॉय म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली. आवारा हा तीन पिढ्यांना कास्ट करणारा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात कपुरांच्या तीन पिढ्या- दिवाण बशेश्वरनाथ (राज कपूरचे आजोबा), पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर झळकले. पुढील काळात रणधीर कपूरने ‘आज और कल’मध्ये हीच पुनरावृत्ती केली.
राज कपूर हे केवळ अभिनेता-दिग्दर्शक आणि निर्मातेच नव्हते तर त्या काळात सिनेमाच्या भविष्याचा वेध घेणारे महान कलावंत होते. राज कपूर यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, हा अभिनेता कधीही बेडवर झोपला नाही. त्याला जमिनीवर झोपायला आवडायचं. हॉटेलमध्ये राहूनही ते जमिनीवर झोपायचे. यासाठी त्यांना एकदा हॉटेल व्यवस्थापकाने ताकीद दिली होती आणि तसे न करण्यास मनाई केली होती. ती न ऐकल्याबद्दल हॉटेल व्यवस्थापकाने दंडही ठोठावला आणि या सवयीमुळे ते पाच दिवस दंड भरत राहिले.
आणखी एक किस्सा सांगितला जातो. राज कपूर आणि त्यांची पत्नी कृष्णा हे दोघे दादा बिमल रॉय यांच्या ‘दो बिघा जमीन’च्या प्रीमियममध्ये पोहोचले होते. चित्रपट सुरू झाला आणि राज प्रचंड अस्वस्थ झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. चित्रपट संपल्यानंतर ते घरी परतताना पूर्ण शांत होते. घरी आल्यानंतरही त्यांची अस्वस्थता दूर झाली नाही. जेव्हा कृष्णा कपूरने कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राज अश्रूभरल्या डोळ्यांनी म्हणाले की, कृष्णा, मी कोणत्या प्रकारचे चित्रपट बनवत आहे? ज्यात फक्त नायिकेच्याभोवती नृत्य आहे.
आपण काल पाहिला तो खरा सिनेमा! जो चित्रपट समाजाला नवी दिशा देतो, समाजाचे वास्तव मांडतो तो खरा चित्रपट. असे चित्रपट बनवल्याशिवाय मला शांती मिळणार नाही. व्लादिमीर वायसोत्स्की यांच्या रशियन गाण्यात राज कपूर यांचे वर्णन भारतीय संस्कृतीचे सर्वात प्रसिद्ध प्रतीक म्हणून केले गेले आहे. सिनेमा हा समाजाचा आरसा असतो, असं म्हणतात. राज यांच्या चित्रपटांनी हे सिद्ध केले.
राज कपूर यांचा संपूर्ण जीवनप्रवास पाहिल्यास हा कलाकार पूर्णतः सिनेमामय होता. ते सदैव सीन आणि कॅमेरा यांचा विचार करत असत.