हम न रहेंगे, तुम न रहोगे, फिर भी रहेगी निशानीयां…

राज कपूर मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. कर्जबाजारी झाले होते. त्यांनी मोठ्या कष्टाने उभा केलेला आणि त्यांचा प्राण असलेला आर के स्टुडीओ विकण्याची वेळ आली होती. आर के स्टुडीओचे राज यांच्या आयुष्यात काय महत्व आहे याची नर्गिस यांना कल्पना होती. त्यांनी आपले दागिने विकले आणि आर के स्टुडीओ वाचवला.
– ऋषि कपूर, राज कपूर यांचे पुत्र

राज कपूर… हिंदी चित्रपट सृष्टीच्या अंतापर्यंतही मिटणार नाही किंवा मिटवता येणार नाही असे नाव. राज ज्यावेळी चित्रपट सृष्टीत दाखल झाले तेव्हा निर्माता दिग्दर्शकाचे वय पन्नाशीत असले पाहिजे असा अलिखित नियम होता. काहींचे त्यापेक्षाही जास्त होते. मात्र राज यांनी हा ट्रेंड मोडला. वयाच्या ऐन वीशीत त्यांनी दिग्दर्शनाची कमान सांभाळलीच, मात्र भारतीय चित्रपट सृष्टीत त्यापूर्वी कोणी संपादन केले नव्हते, असे यशही संपादन करून दाखवले. त्यामुळे केवळ 28 वर्षे वय असताना त्यांना द ग्रेट शोमन हा किताब त्यांना मिळाला.

हा काही अधिकृत सोहळ्यात प्रदान केला जाणार किताब नाही. तर त्या व्यक्तीवर, त्याच्या कलाकृतींवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी तसेच त्याच्या समकालीन नायक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी मनोमन दिलेली ही मानवंदना आहे. ती वयाच्या तीशीच्या आतच राज कपूर यांना मिळाली होती. यावरून या महान कलाकाराची थोरवी समजते.

काही नावे त्यासोबत काहीतरी जोडल्या शिवाय अपूर्ण असतात. जसे शोमन ही उपाधी जोडल्या शिवाय राज कपूर पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही, तसेच नर्गिस यांचे नाव घेतल्याशिवाय राज कपूर पूर्ण होउ शकत नाही. राज यांचे पुत्र ऋषि कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात अनेक बाबींचा खुलासा केला आहे. त्यात अर्थातच नर्गिसजींचे नाव आले आहे. नर्गिस ह्या राज कपूर यांच्या जिवनातला अविभाज्य आणि कधीही वगळता न येणारा घटक होता. तेव्हाही नव्हता अन आजही ते दोघे कलाकार हयात नसतानाही आहे.

प्रत्येक प्रेमकथेत एक व्हिलन असतोच. राज कपूर यांच्या चित्रपटांतही तो होता. मात्र या दोघांच्या प्रेमकथेत असा कोणी खलनायक नव्हता. जे काही होते ते नियतीने लिहिले होते. राज यांचा काहीसा रंगीला स्वभाव याला कारणीभूत असू शकतो असे जरी मानले तरी त्यांना त्यांच्या अवगुणांसह दोन महिलांनी पूर्णत: स्वीकारले होते. त्यात एक होत्या त्यांच्या पत्नी कृष्णा कपूर अर्थात पूर्वाश्रमीच्या कृष्णा मलहोत्रा आणि दुसऱ्या होत्या नर्गिस.

नर्गिस यांचे राज यांच्या आयुष्यात काय स्थान आहे हे कृष्णा यांनाच नव्हे, तर संपूर्ण चित्रपटसृष्टीला आणि त्याबाबत सजग आणि साक्षर असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला माहित होते. राज यांचा आर. के. स्टुडीओ आणि व त्यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या सुरूवातीला दाखवली जाणारी ती प्रतिकृती ही राज आणि नर्गिस या दोघांचीच छबी आहे.

अंदाज चित्रपटाच्या सुरूवातीला ते प्रथम भेटले. दिलीप कुमारही या चित्रपटात होते. मात्र लव्ह ऍट फर्स्ट साइट म्हणतात तसेच राज कपूर यांच्या बाबतीत झाले. ते नर्गिस यांच्या प्रेमातच पडले. आपल्या पहिल्या भेटीचा किस्सा जरी त्यांनी खास रंगवून सांगितला नसला तरी बॉबी या सत्तरच्या दशकात त्यांनी डिंपल कापडीयाला पडद्यावर आणताना पहिल्या भेटीत नर्गिस त्यांना कशा भासल्या आणि ते पहिल्याच क्षणी कसे त्यांच्या प्रेमात पडले हे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते.

राज जेव्हा चित्रपट सृष्टीत आले, तेव्हा अगदीच नवखे. नाही म्हणायला पिता पृथ्वीराज कपूर यांच्या समवेत त्यांनी काम केले होते. रंगमंचाच्या मागच्या बाजूला असलेले नियोजन पार पाडण्याची जबाबदारी त्यांची असायची. पित्यासोबत ते भरपूर फिरलेही होते. अनेक ठिकाणी त्यांचे शालेय शिक्षण झाले व पृथ्वीराज यांच्या सोबत जगाच्या शाळेतले ज्ञानही त्यांनी आत्मसात केले.

एखाद्या लेखकाला अथवा दिग्दर्शकाला प्रेझेंटर म्हणून विकसित व्हायला बराच कालावधी लागतो. अनेक वर्षांची तपश्‍चर्या असते ती. मात्र राज कपूर यांनी सगळे लिलया साध्य केले होते. त्यात अर्थातच त्यांची बुध्दीमत्ता तर होतीच, मात्र त्याहीपेक्षा त्यांचे त्यांच्या कलेवर, कलाकृतीवर असलेले प्रेम याचा मोठा वाटा आहे. या मनस्वी कलाकाराला गरज होती ती केवळ एका प्रेरणेची…नर्गिस त्यांच्या आयुष्यात आल्या अन तीही पूर्ण झाली.

राज आणि नर्गिस प्रेमात पडणारच असेच काहीसे इश्‍वरीय संकेत असावे. तसे झाले नसते तरच नवल होते, इतके ते दोघे परस्परांसाठी पूरक होते. त्यांनी तब्बल 16 चित्रपटांत काम केले. त्यातले 6 तर आरके च्या बॅनरखालीच तयार करण्यात आलेले. ते सगळेच यशस्वी ठरले. अभिनय, दिग्दर्शन, गाणी, शब्दरचना,संवाद, भव्य सेटस अशा सगळ्याच अंगाने हे सगळे चित्रपट मास्टरपीस होते. भारतीय चित्रपटसृष्टीने आपले हे मोठेपण अभिमानाने मिरवावे आणि रसिक प्रेक्षकांनी आपला हा ठेवा अभिमानाने सगळ्यांना सांगावा असे हे चित्रपट. त्यातली गाणी…आजही सगळ्यांना तृप्त करणारी, त्या दशकांत, त्या सुवर्ण कालखंडात नेणारी.

राज जेव्हा नर्गिस यांच्या आयुष्यात आले तेव्हा त्या केवळ 19 वर्षांच्या होत्या. राज हेच त्यांचे पहिले प्रेम. 1949 मध्ये झालेली त्यांची भेट पुढचे अर्धे दशक भारतीय चित्रपटसृष्टीला उपकृत करून गेली. आरके चा कोणताही चित्रपट असो त्यात अन्य जुळवाजुळव होण्याच्या अगोदरच नर्गिस यांचे नाव तेथे झळकलेले असायचे. राज यांनी कथा सांगावी, न सांगितली तरी चालेल, नर्गिस यांचा प्रत्येक चित्रपटाला होकार असायचा. दोघे प्रेमात होते. या केवळ अफवा आणि चर्चा नव्हत्या. ऋपि कपूर यांनीही त्यांच्या आत्मचरित्रात याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.

मनाचे तार जुळलेले हे दोघे कलाकार कधीच परस्परांशी एकरूप झालेले होते. अडचण होती ती फक्त राज यांचे विवाहीत असणे. त्यांचे लग्न झाले होतेच, पण त्यांना पाच मुलेही होती. राज यांनी नर्गिस यांना याची कल्पना दिली होती.

असे म्हणतात राज यांच्या जिवनात दुय्यम भूमिका स्वीकारण्याचीही नर्गिस यांची तयारी होती. मात्र त्यांना पत्नीचा दर्जा हवा होता. त्यांनी अनेक नामवंत वकीलांशी चर्चा केली होती. काहीतरी मार्ग निघेल आणि त्यांना राज यांच्या पत्नी होता येईल. मात्र राज यांना नर्गिस यांच्याशी लग्न करायचेच नव्हते असेही बोलले जाते. त्यांनी स्वत: नर्गिस यांना त्याची कल्पना दिली होती असेही सांगणारे सांगतात. पण नर्गिस त्यांच्या प्रेमात बुडाल्या होत्या.

1956 मध्ये आलेला चोरी चोरी हा त्यांनी एकत्र केलेला अखेरचा चित्रपट. त्यानंतर नर्गिस आर. के. स्टुडीओचा उंबरा ओलांडून बाहेर पडल्या त्या कायमच्याच. त्यावेळेच्या माध्यमांच्या बातम्यांवर विश्‍वास ठेवावा तर आर. के. स्टुडीओ आणि राज यांच्या जिवनात एका अभिनेत्रीचा प्रवेश नर्गिस यांना दुखावून गेला. त्यातून त्या सावरल्याच नाहीत. या संबंधांना आता विराम द्यावा असे त्यांनी त्याच वेळी मनोमनी ठरवून टाकले. नंतर त्या पुन्हा स्टुडीओकडे परतल्या नाहीत.

मदर इंडियात त्या काम करत होत्या. या चित्रपटाच्या सेटवर एक भीषण दुर्घटना घडली. खरेतर नर्गिस यांचा तो काळ आला होता. मात्र वेळ आली नव्हती. सुनील दत्त यांनी या अपघातातून नर्गिस यांना वाचवले आणि त्या मिसेस दत्त झाल्या. खुद्द सुनील दत्तही त्यांना याच नावाने संबोधायचे, त्यांच्याशी संवाद साधायचे.

नर्गिसजींचा असा विवाह राज यांनाही नैराश्‍यात लोटणारा ठरला. नर्गिस केवळ त्यांचे प्रेम नव्हते, तर प्रेरणा होती. तीच आता त्यांच्यासोबत त्यांच्या स्टुडीओत नव्हती. राज कपूर यांनी बरेच दिवस स्वत:ला कोंडून घेतले होते.

एक किस्सा असाही सांगितला जातो. एका पार्टीच्या निमित्ताने राज, नर्गिस आणि कृष्णा कपूर एकत्र आले होते. त्यावेळी एकांतात नर्गिस आणि कृष्णा यांची चर्चा झाली. तुमच्या आयुष्यात निर्माण झालेल्या सगळ्या वादळांना मी जबाबदार असल्याची खंत नर्गिसजींनी कृष्णा यांच्याकडे खजिल मनाने व्यक्त केली होती. त्यावर ” मी (कृष्णा कपूर) त्या जागी नसते तर माझ्या ऐवजी अन्य कोणीतरी असती ” असे उत्तर कृष्णा यांनी दिले होते.

राज आणि नर्गिस यांच्याबद्दल कोणीतरी यथार्थ शब्दांत वर्णन केले आहे.. .

त्यांना रोखू शकेल असे काहीच नव्हते. त्यांना अलग करू शकेल असेही काही नव्हते. दोघांमध्ये एक पुसटशी रेघही नव्हती, इतके ते एकरूप झाले होते. प्रेम, भांडण, अश्रू, रूसवा-फुगवा, त्यानंतरची माघार आणि समेट… आयुष्य म्हणजे तीच त्याच्यासाठी सर्वस्व होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.