ददयाल (पाकिस्तान व्याप्त काश्मीर) – पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील ददयाल शहरामध्ये एका कार्यकर्त्याने सार्वजनिक ठिकाणचा पाकिस्तानचा ध्वज काढला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून त्याला धमक्या आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोपही या कार्यकर्त्याने केला आहे.
आपण सार्वजनिक ठिकाणी फडकावलेला पाकिस्तानचा ध्वज हटवल्याचे या सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार तन्वीर अहमद याने एक व्हिडीओमध्ये सांगितले आहे. गुप्त पोलिसांकडून आपला पाठलाग केला जात असल्याचे या कार्यकर्त्याने म्हटले आहे. नंतर तो एका भिंतीवर चढला आणि चौकातील पाकिस्तानचा आणखी एक ध्वज त्याने खाली उतरवला.
परिसरातील सार्वजनिक ठिकाणचे पाकिस्तानचे सर्व ध्वज हटवण्यात यावेत, या मागणीसाठी तन्वीर अहमदने काही दिवसांपूर्वी उपोषणही केले होते. मात्र स्थानिक प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याने स्वतःच सर्व ध्वज हटवण्यास सुरूवात केली. त्यानंतर तन्वीरला सुरक्षा रक्षकांकडून मारहाण आणि धमक्या दिल्या जायला लागल्या, असे सूत्रांनी म्हटले आहे.
पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर पाकिस्तानने बेकायदेशीरपणे कब्जा केला असल्याने तेथील नागरिक पाकिस्तान प्रशासनाला विरोध करत आहेत. या भागातून पाकिस्तानी सुरक्षा दल आणि सरकारी कार्यालयांमधील पाकिस्तानी कर्मचाऱ्यांनी तेथून निघून जावे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.