पुणे – जागतिक नवसंकल्पना क्रमवारीत (ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020) भारताने जगातील पहिल्या पन्नास देशांत स्थान प्राप्त केले आहे. गेल्या वर्षीच्या क्रमवारीत 52व्या स्थानी असलेल्या भारताने यंदा 48वे स्थान प्राप्त केले आहे.
वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, कॉर्नेल विद्यापीठ आणि इनसिड बिझनेस स्कूल यांच्या वतीने ही क्रमवारी जाहीर केली. शिक्षण, पेटंट अशा विविध निकषांवर जगभरातील 131 देशांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले. त्यानंतर ही जागतिक क्रमवारी जाहीर केली. क्रमवारीत स्वित्झर्लंडने पहिले स्थान पटकावले आहे. त्यानंतर स्वीडन, अमेरिका, युनायटेड किंग्डम आणि नेदरलॅंड्स यांचा क्रमांक लागतो.
क्रमवारीत यंदा भारताला 48वे स्थान मिळाले आहे. मध्य आणि दक्षिण आशिया विभागात भारताने पहिला क्रमांक मिळवला असून, माहिती तंत्रज्ञान सेवा निर्यात, शासकीय ऑनलाइन सेवा, विज्ञान आणि अभियांत्रिकीतील पदवीधर, जागतिक कंपन्यांसह संशोधन आणि विकास अशा विविध 15 निकषांवर भारत पहिल्या स्थानी असल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे.
विद्यापीठाने गतवर्षीचे मानांकन राखले कायम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक विद्यापीठाच्या क्रमवारीत पहिल्या सहाशे ते आठशे यादरम्यान स्थान मिळविले आहे. पुणे विद्यापीठाने गतवर्षीचे मानांकन कायम राखले आहे. शैक्षणिक संस्थांचे जागतिक स्तरावर मूल्यांकन करणाऱ्या “टाइम्स हायर एज्युकेशन’ या संस्थेने या वर्षाची जागतिक विद्यापीठाची क्रमवारी जाहीर केली. त्यानुसार पहिल्या एक हजार विद्यापीठांची नावे जाहीर केली जातात. हे मानांकन जगभरात प्रतिष्ठेचे मानले जाते.
‘टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड रॅंकिंग’मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या वर्षीचेच रॅंकिंग कायम ठेवलेले आहे. विद्यापीठातील मोठ्या प्रमाणात संशोधनात्मक काम करणारे प्राध्यापक, प्रशासनातील सहकारी यांच्या सर्वांच्या मेहनतीचेच हे यश आहे.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू