मागील लेखात नमूद केल्याप्रमाणं, निफ्टीनं गेल्या एकाच आठवड्यात 11700 या पातळीवर प्रतिकार व 11500 या पातळीच्या खाली आधार अनुभवलाच. सोमवारच्या सुटीनंतर लगेचच निफ्टीनं 11700 ही पातळी 17 जुलैनंतर पहिल्यांदाच गाठली, परंतु हा आनंद फार वेळ राहिला नाही. शुक्रवारच्या सत्रात निफ्टी 11500 या पातळीच्या खाली डुबकी मारून पुन्हा 11583.9 वर स्थिरावली.
पुन्हा या आठवड्यात निफ्टीस 11650 ते 11700 या पातळ्यांवर नफेखोरी संभावते. शुक्रवारी निफ्टीनं लघुअवधीसाठीचा चढता कल छेदून त्याखाली म्हणजे 11630 च्या खाली बंद दिल्यानं पुन्हा 11500 ही पातळी तोडल्यास 11370 – 11350 या टप्प्यापर्यंत निफ्टी घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्टेट बॅंकेचे अपेक्षेपेक्षा बरे आलेले निकाल बॅंकिंग शेअर्सना हात देतील वाटत असताना या आठवड्यात असणारे आयसीआयसीआय बॅंक, भारती, इंडियन ऑइल, डॉ. रेड्डी, येसबॅंक यांचे तिमाही निकाल या महिन्याची डेरिव्हेटीव्ह व्यवहारांची सांगता, गरमागरम ब्रेक्झिट व धुमसतं अमेरिका -चीन ट्रेडवॉर, अशा जागतिक घडामोडी आणि आठवड्याच्या शेवटास येणारे वाहन उद्योगातील कंपन्यांचे सणासुदीनंतरचे विक्रीचे आकडे यांकडे बाजार लक्ष ठेऊन असेल, हे काय वेगळं सांगायची गरज नाही..