पुणे – चवीला गोड, कमी बिया आणि आकाराने मोठा असलेल्या रायपुर पेरूचा हंगाम सुरू झाला आहे. आठवड्यापासून मार्केट यार्डातील फळ विभागात आवक होत आहे. करोनाचा फटका मागणीला बसला आहे.
नेहमीच्या तुलनेत कमी मागणी आहे. त्यामुळे हंगाच्या सुरुवातीला गेल्या वर्षीपेक्षा 30 टक्के कमी भाव मिळत आहे. घाऊक बाजारात किलोला 80 ते 120 रुपये भाव मिळतो. तो यावर्षी 30 ते 70 रुपये असल्याचे व्यापारी संतोष ओसवाल यांनी सांगितले.
येथील बाजारात मंगळवारी (दि.3) दहा किलोच्या 100 ते 150 बॉक्सची आवक झाली. जिल्ह्यातील बारामती भागासह सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतून आवक होत आहे. फळाचे वजन 500 ते 700 ग्रॅम आहे. हंगाम डिसेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे.
दरम्यान, नियमित पेरूची 800 ते 900 कॅरेट आवक झाली. घाऊक बाजारात 20 किलोस 250 ते 400 रुपये भाव मिळत आहे. जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातून नियमित पेरूची आवक होत आहे.