रेल्वे रूळाखालील रस्त्यात पावसाचे पाणी

कोपर्डेहवेली -शिरवडे स्टेशन जवळील रेल्वे गेट नं. 95 बंद करून उत्तर कोपर्डे येथे रूळाखालून बोगदा काढण्यात आला आहे. मात्र येथे पावसाचे पाणी साठत असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. पाण्यातून वाट काढत वाहनधारकांना जावे लागले. याबाबत रेल्वे प्रशासन बेदखल असून स्थानिक लोक सतत घडणाऱ्या अपघातांमुळे हवालदिल झाले आहेत.

शिरवडे स्टेशनलगत नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे ही गावे आहेत. येथे असणारे रेल्वे गेट बंद करून रूळाखालून बोगद्याच्या रस्त्याचा पर्याय काढण्यात आला. स्थानिकांनी भविष्यात होणाऱ्या गैरसोयी तसेच बोगद्याची जागा चुकीची असल्याबाबत तीव्र विरोध केला. मात्र रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जुमानले नाही. त्याचा परिणाम म्हणून सुरूवातीच्या पावसानेच बोगद्यात स्थानिकांची परवड केली. तब्बल दिड दोन फूट पाणी साठल्याने वाहने ढकलत न्यावी लागली. त्यानंतर पाणी वाहून गेल्याने गाळ साठलेला आहे. त्यात वाहने घसरल्याने किरकोळ अपघातांची मालिका घडत आहे.

पुलाजवळ तीव्र वळण असल्यामुळे समोरून येणारे वाहने दिसण्यासाठी मिरर रिफ्लेक्‍टरची तीव्र गरज आहे. या ठिकाणी छोट्या मोठ्या अपघातांची मालिका घडतच असते. याबाबत नडशी ग्रामपंचायतीकडून रेल्वे प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे. तरीही रेल्वे प्रशासन गाढ झोपेत असल्याचे दिसते. रेल्वे लाइन रुंदीकरणात तडजोडीचे तकलादू कारण सांगण्यात येत आहे. पुलासाठी निवडण्यात आलेली जागा ही महादेव डोंगर उतारावर असल्याने पावसाळ्यात या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर साचत असते. पुलाजवळचा परिसर आधीच दलदलीचा आहे. याठिकाणी पाणी साचल्याने त्याचा वाहतुकीवर विपरीत परिणाम होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.