“रेनवॉटर हार्वेस्टिंग’मधील बनवेगिरी होणार उघड

व्यवस्था बंद असतानाही सवलत, अनुदान घेणाऱ्यांची आता खैर नाही


10 टक्‍के अनुदान आणि मिळकतकरात 5 टक्‍के सूट


महापालिका आयुक्‍त अचानक करणार पाहणी

पुणे – रेनवॉटर हार्वेस्टिंग खरेच केले आहे का, याची अचानक पाहणी महापालिका आयुक्‍त करणार आहेत. यासाठी 10 टक्‍के अनुदान महापालिकेकडून दिले जाते. नवनियुक्‍त आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी हे जाहीर केले आहे.

महापालिकेने उत्पन्नाचे स्त्रोत शोधण्याला सुरुवात केली आहे. मात्र, ज्या ज्या ठिकाणी सवलती दिल्या जातात, त्या सोयी खरेच जागेवर केल्या आहेत का, याची पाहणी प्रशासन करणार आहे. त्यातीलच एक भाग हा रेनवॉटर हार्वेस्टिंग हा आहे.

जलसंधारणाचाच हा एक प्रकार असून, इमारतींच्या टेरेसवर जमा झालेले पावसाचे पाणी थेट भूगर्भात सोडणे ही संकल्पना यामध्ये आहे. यासाठी महापालिकेकडून 10 टक्‍के अनुदान तर दिले जातेच परंतु मिळकतकरातही 5 टक्‍के सूट दिली जाते.

ही सूट आणि अनुदान मिळवण्यासाठी या सवलती केल्याचे अनेकदा भासवले जाते, तसेच काहीवेळा ती व्यवस्था बिघडल्यास ती कार्यान्वित केली जात नाही, मात्र सवलत सुरूच राहाते. पर्यायाने यामध्ये महापालिकेचे नुकसान होते. त्यामुळे या व्यवस्था सुरू आहेत की नाही, याची वेळोवेळी पाहणी करणे अत्यंत आवश्‍यक आहे. तेच आता प्रशासनाने हाती घेतले असून, अचानक पाहणीतून या व्यवस्था सुरू आहेत का, विनाकारण अनुदान लाटणे किंवा सवलती मिळणे असे होत नाही ना, याची पाहणी आता केली जाणार आहे.

भूसर्व्हेक्षण संचालक असताना शहरात भूगर्भात कोठेही पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून आले नव्हते. “रेनवॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबवत असताना ते पाणी भूगर्भात जाईल हे पाहणे आवश्‍यक आहे. अनेक ठिकाणी ते पाणी भूगर्भात न सोडता ड्रेनेज लाइनला जोडले जाते. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची अचानक पाहणी केली जाणार आहे.
– शेखर गायकवाड, आयुक्‍त, महापालिका

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.