खासगी ठिकाणी पालिकेच्या पैशांतून रेनवॉटर हार्वेस्टिंग नाहीच

आयुक्तांचे मुख्यसभेत स्पष्टीकरण : नगरसेवकांचा प्रस्ताव फेटाळला

पुणे – महापालिकेच्या पैशांमधून रेनवॉटर हार्वेस्टिंग खासगी ठिकाणी करण्याचा नगरसेवकांचा प्रस्ताव महापालिका मुख्यसभेत सोमवारी फेटाळण्यात आला. महापालिकेच्या पैशांतून हे रेनवॉटर हार्वेस्टिंग केवळ महापालिकेच्या आणि शासनाच्या स्वत:च्या मिळकतींवर करावे, अशी उपसूचना देत ठराव दुरूस्त करण्यात आला आणि तो मंजूर करण्यात आला. वास्तविक महापालिकेच्या इमारतीत ही सोय करण्यासाठी वेगळ्या परवानगीची गरजही नाही. परंतु ठराव दुरुस्त करण्यात आला.

खासगी सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी वॉर्डस्तरावर प्रत्येक नगसेवकांच्या निधीतून 10 लाख रुपये वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीतून मंजूर होऊन मुख्यसभेत मंजुरीसाठी आला होता. “ज्यांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग केले आहे, त्यांना आपण मिळकतकरात 5 टक्के सवलत देतोच. हा यंत्रणा उभीही आपण करून द्यायची आणि 5 टक्के सवलतही द्यायची, हे योग्य आहे का,’ असा प्रश्‍न कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला. तर “केवळ रेनवॉटर हार्वेस्टिंगच कशाला आपण कचरा प्रक्रिया प्रकल्प, सौरऊर्जा या सोयीही करून देऊ,’ असा उपरोधिक टोला चेतन तुपे यांनी हाणला.

यावर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी खुलासा केला. “हा जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे अत्यंत आवश्‍यक आहे. शहरी भागात ते गरजेचेच झाले आहे. यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. त्यामध्ये नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन आणि संगोपन, तळी, जलाशय, विहिरी यांची देखभाल या गोष्टींचा समावेश आहे. परंतु शहरात जलपुनर्भरणासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उपयुक्त आहे. कायद्यानुसार खासगी ठिकाणी हे करण्यासाठी महापालिकेचा निधी वापरला जाऊ शकत नाही. यासाठी खासदार, आमदार निधी वापरला जात नाही, तसा नगरसेवकांचा निधीही वापरता येणार नाही,’ असे राव यांनी स्पष्ट केले

“जर असे करायचे असेल तर संबंधित जमीन ही त्यांना महापालिकेला दान द्यावी लागेल. जे शक्‍य नाही. मात्र महापालिका, शासकीय इमारती यांच्यावर ही सोय महापालिकेच्या अर्थात नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून करता येऊ शकतो. तसा विचार झाला तर तो स्वागतार्ह आहे,’ असे राव यांनी नमूद केले.

मात्र, “रेन वॉटर हार्वेस्टिंग आता जसे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सोसायट्यांनी ते करावे, कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारावा यासाठी काही मार्गदर्शन हवे असल्यास ते महापालिका मोफत देण्याला तयार आहे,’ असे राव यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.