शेवगाव – रविवारी तालुक्यात वादळ वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी झाल्या. सोमवारी वातावरणात थोडा बदल झाल्याचे जाणवताच येथे शेतकऱ्यांची बी भरणाची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा कपाशीकडे मोठा कल आहे. त्यामुळे शेवगाव तालुक्यात किमान 42 हजार हेक्टरच्यावर कपाशीची विक्रमी लागवड होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांचे तुळशी कंपनीचे कबड्डी, महको सीडचे बाहुबली, यूएस ऍग्री सीड चे 7067, नुजीवीडू कंपनीचे आशा, नाथ सीड्सचे संकेत, एल्डोरॅडो सीडस्चे जयहो, राशीचे 659, बायो सीडसचे 029 तर प्रभात सीडसचे सुपर कॉट या वाणास विशेष मागणी आहे. मात्र या वाणाचा बाजारात तुटवडा आहे. त कबड्डी व 7067 वाण बाराशे ते दीड हजार रुपये दराने तर नाथ सीडच्या संकेत वाण तब्बल अडीच हजार रुपये दराने उपलब्ध केले जात असल्याचे दबक्या आवाजात सांगितले जात.
सध्या महिकोचे जंगी, धनदेव, कावेरी सीडचे जादू, राशी सीडसचे मॅजीक, अजित सीडसचे 1199, टाटा कंपनीचे आतीश, मार्कोव सीडचे काकाजी व संदेश आदी वाणांचे 475 ग्रॅम वजनाच्या कपाशी बियाण्यांचे पाकीट 853 रुपयात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी एकाच वाणाच्या बियाण्याचा हट्ट धरू नये. तसेच पेरणी योग्य पाऊस झाल्य शिवाय पेरा करू नये, असे शेवगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल कदम म्हणाले.
सध्या सर्व प्रकारची खते उपलब्ध आहेत, शासनाने रासायनिक खतांचा बफर स्टॉक करू नये. शॉर्टेज असल्यावर बफर स्टॉक करणे संयुक्तिक आहे, असे शेवगाव तालुका बी- बियाणे खते विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे म्हणाले.