पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज
पुणे – उकाड्याने हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना थोडा दिलासा मिळणार असून पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावणार आहे. त्यापूर्वी राज्यातील सर्वच ठिकाणच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. पुण्यातही पावसाचा अंदाज असला, तरी शुक्रवारी तापमान 40 अंशांपर्यंत पोहचले होते.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरात तापमानवाढीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर कमाल आणि किमान तापमानात किंचित चढ-उतार झाले. मात्र, अनेक दिवस कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या आसपास राहिला. गुरुवारी कमाल तापमान 41 अंशांच्या आसपास पोहोचले असून, सरासरीच्या तुलनेत हे तापमान तब्बल 3.1 अंशांनी अधिक आहे. किमान तापमानही 20 अंशांच्या आसपास आल्याने रात्रीही उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, 13 ते 16 एप्रिलदरम्यान मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यादरम्यान तापमानात काहीशी घट होण्याचाही अंदाज आहे.
पावसाच्या शक्यतेपूर्वी राज्यातही तापमानवाढ कायम आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. चंद्रपूरमध्ये गुरुवारी राज्यातील उच्चांकी 45.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अकोला, अमरावती, वर्धा या ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे.