कराड-पाटणला पावसाचा तडाखा

कराड-विटा मार्ग बंद कराडला विक्रमी पावसाची नोंद सेवा रस्ते बनले जलमय शेतींची शेततळी; तर ऊस भुईसपाट

कराड – मुसळधार पावसाने कराड व पाटण तालुक्‍यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या सेवारस्ते जलमय बनले आहेत. तर शेतांना शेततळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून वाहतूक विस्कळीत झाली होती. तर रस्त्यांवर पाणी साचल्याने कराड-विटा रोड व कराड-तासगाव रोडवरील वाहतूक ठप्प झाली.

दरम्यान, बुधवारी दिवसरात्र पडणाऱ्या पावसामुळे कराड तालुक्‍यात सुमारे 100.69 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर पाटण तालुक्‍यात 69.64 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे दोनही तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.

पश्‍चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून कराड व पाटण तालुक्‍यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे कराड-विटा मार्गावर येथील कॅनॉल परिसरात पाणी साचून राहिल्याने येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तसेच कराड-तासगाव मार्गावर सुरू असलेल्या रस्ता रूंदीकरणाच्या कामामुळे मुळातच अडचणीत आलेला शेतकरी रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पुन्हा अडचणीत आला. हजारो एकर शेतजमिनीचे शेततळे बनल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.

दरम्यान, वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे कराड परिसरातील अनेक महाकाय वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. तर खरीप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांना मोठा फटका बसला आहे. ऐन काढणीच्या भरात असणारे भातपीक झोपले आहे. तर ऊसाचीही तीच अवस्था झाली आहे.

येथील खोडशी बंधाराही ओसंडून वाहत आहे. तर बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील ओढे-नाले तुडूंब भरून वाहत होते. तर कोयना धरणातून सुमारे 15 हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याने कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना धोक्‍याचा इशारा दिला आहे.

बुधवारी कराड शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल परिसरात पाणी साचून राहिले होते. येथील भाजी मंडई परिसर, भेदा चौक, पोपटभाई पेट्रोल पंप, तालुका पोलीस स्टेशन, संभाजी भाजी मार्केट, नवीन प्रशासकीय इमारतीचे पार्किंगला स्विमिंग पूलचे स्वरूप प्राप्त झाले होते. मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या धान्य व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक बेसमेंट असणाऱ्या व्यापाऱ्यांचे या पावसाने पुरती दमछाक केली. येथील माल बाहेर काढणे आणि बेसमेंटमधील पाणी उपसून टाकणे या व्यापात गुरूवारी दुपारपर्यंत शहरातील व्यापारी गुंतले होते.

भाजी मंडई परिसरात रस्त्यावर बसलेल्या लहान-मोठ्या किरकोळ विक्रेत्यांचे नुकसान झाले आहे. ओला भाजीपाला, कडधान्ये, मासाळी आदी विक्रेत्यांना आलेल्या मुसळधार पावसामुळे माल तेथेच ठेवून जाण्याची वेळ आली. अनेक ठिकाणचे नालेसफाई नसल्याने पाणी तुंबले होते तसेच परिसरात दुर्गंधी पसरली होती. दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता.

वाठार-रेठरे वाहतूक ठप्प
रेठरे बुद्रुक  -बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे वाठारमार्गे कृष्णा कारखान्याकडे जाणारा रस्ता जलमय झाला. डांबरीवरून वाहणारे पाण्यामुळे या परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
परतीच्या पावसाने गेल्या आठ दिवसात चांगला जोर धरला आहे. याचा सर्वाधिक फटका कृष्णा काठच्या गावांना बसला आहे. ऊस शेतीसह भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, बुधवारी पडलेल्या प्रलयकारी पावसाने या विभागातील लोकांची पुरती तारांबळ उडाली. वाठारहून रेठरे गावाकडे जाणारा रस्ता पहिल्यांदाच पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. या मार्गावरील छोट्या मोहरी, पूल परिसरात दोन्ही बाजूला पाणी साचल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना मोठी अडचण निर्माण झाली होती.

दि. 19 ऑक्‍टोबरपर्यंत पंचनामे सादर करा…
ऑक्‍टोबरमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत संयुक्‍त पंचनामे करून 33 टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे शासनाने निश्‍चित केलेल्या दरानुसार नुकसान भरपाई बाबतचे प्रस्ताव करण्यात यावेत. तसेच 33 टक्केपेक्षा जास्त नुकसानीबाबत जिल्हयातील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, गाव कामगार तलाठी संयुक्‍त पंचनामे करून प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तसे अहवाल तयार करून दि. 19 ऑक्‍टोबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

 

गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस सुरु आहे. वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होत आहे. या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात देखील जवळपास सर्वच भागात गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील सोयाबीन, भात, ज्वारी व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत शेती नुकसानीसह, रस्ते, छोटे पूल व पडझड झालेल्या घरांचे तात्काळ पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
ना. बाळासाहेब पाटील, पालकमंत्री

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परतीच्या पावसामध्ये नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तलाठी, ग्रामविकास विभाग तसेच ग्रामपंचायतींना सूचना करण्यात आल्या आहेत. या पावसात झालेली पडझड तसेच पिकांचे पंचनामे केले जाणार आहेत. याकामी शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
आनंदराव देवकर, नायब तहसिलदार, कराड

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.