कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. घटप्रभा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसाने जांबरे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून 31 बंधारे पाण्याखाली आहे.
दरम्यान, राधानगरी, घटप्रभा सह 7 प्रकल्पातून प्रतिसेकंद 15 हजार क्यूसेक चा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळं पंचगंगा, भोगावती , वारणा, घटप्रभा, हिरण्यकेशी, वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झालीय.
पंचगंगेची पाणी पातळी 22 फूट 5 इंचावर असून कोल्हापूर जिल्ह्यातील 2 वाहतूक मार्ग बंद झालेत. पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग 1 आणि प्रमुख जिल्हा मार्ग 1 असे 2 मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांची माहिती दिली आहे.
करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे. तर आजरा तालुक्यातील पासून नवले देवकांडगाव, कोरिवडे, पेरणोली, साळगाव मिळणारा साळगाव बंधाऱ्यावर अर्धा फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून सोहाळे मार्गे वाहतुक सुरू आहे.