सुपा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांची धावपळ

सुपा – पारनेर तालुक्‍यातील सुपा परिसरात गुरुवारी (दि.4) झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. गुरुवारी सकाळी 11 नंतर उष्णतेत वाढ होऊन आकाशात ढग जमा होऊ लागले. सायंकाळी 5 नंतर जोरदार वादळ सुरू झाले. यादरम्यान रायतळे, अस्तगाव, वाळवणे, रुईछत्रपती, पिंपरी गवळी, रांजणगाव मशीद, भोयरे गांगर्डा, बाबुर्डी आदी ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने शासनाच्यावतीने गावोगावी चारा छावणी सुरू करण्यात आली आहेत. उन्हापासून जनावरांचा बचाव व्हावा, म्हणून पशुपालकांनी छावणीच्या ठिकाणी मेढी उभ्या करून त्यावर बांबूचे छत तयार केले. त्यावर कागद, तळवट, जुने पोते अंथरुण निवरा केला आहे. हा निवारा गुरुवारी झालेल्या वादळाने उडून गेल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. प्रत्येक गावात छावण्यास परवानगी मिळाली आहे. छावणी चालकांनी शेतातच जागा निवडल्या आहेत. थोडाफार पाऊस झाला तरी त्या ठिकाणी दलदल होणार आहे.

दरम्यान गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने, परिसरात कमालीचा गारवा जाणवला, वादळाने मोठे-मोठे झाडे उन्मळून पडली तर, थोड्याफार पाण्यावर जीवाचे रान करून पिकवलेला कांदा शेतातच भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुसऱ्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत पावसाचे वातावरण होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.