पुणे – हवामानात सतत होत असलेला बदल आणि वाढते तापमान यामुळे राज्यात पुढील तीन ते चार दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. या अवकाळी पावसामुळे तापलेला विदर्भ शांत होणार का? आणखीन तापणार. राज्यात आज सर्वाधिक ब्रह्मपुरी येथे 46.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत वाढ झाली आहे. तर उर्वरीत भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. फणी चक्रीवादळामुळे राज्यातील कमाल तापमान चार ते पाच अंशाने घटले होते. मात्र, चक्रीवादळ बांगलादेशकडे वळाले आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान झपाट्याने वाढू लागले. त्यातच अवकाळी पाऊस पडून गेल्यावर गरमाईन नागरिक हैराण होत असून, पुढील दोन दिवसात (दि. 8 आणि 9) विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
एकीकडे विदर्भामध्ये उष्णतेची लाट आहे, तर दुसरीकडे दि. 10 आणि 11 मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकाडासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या अवकाळी पावसामुळे तापलेला विदर्भ शांत होणार की, पुन्हा आणखीन तापणार. अधीच एप्रिल महिन्यात सुर्यनारायणाने चटके देऊन जगणे असह्य केले होते. उष्णाघाताचे काही बळी पडले. तीच अवस्था मे महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनीही खबरदारी बाळगावी.
राज्यातील काही प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) – ब्रह्मपुरी 46.2, चंद्रपूर 45, परभणी आणि नागपूर 44.6, वर्धा 44.5, अकोला 44.4, अमरावती 44, यवतमाळ 43.5, बीड आणि वाशिम 43.2, गोंदिया, सोलापूर आणि नांदेड 43, जळगाव 42.6, उस्मानाबाद 41.8, मालेगाव 41.6, औरंगाबाद 41.2,
पुणे 39.1, सातारा 38.9, सांगली 38.2, नाशिक 37.2.