पुणे -उत्तर महाराष्ट्र ते कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर उत्तर कोकण व दक्षिण गुजरात या परिसरात चक्रावाताची स्थिती आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने आगामी काळात पावसाचा जोर वाढणार आहे.
राज्यात आज सर्वत्र पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबईतही पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्याबरोबर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती. आंध्र प्रदेश, दक्षिण-मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसिमा या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राचे चक्राकार वाऱ्यामध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पावसाची शक्यता अधिक आहे.