दुष्काळापाठोपाठ परतीच्या पावसाचा फटका

गणेश घाडगे
शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, बळीराजा अडचणीत 

नेवासे  – गेल्या दोन वर्षात पावसाने पाठ फिरवल्यामुळे पडलेल्या दुष्काळात बळीराजा सावरलेला नसतानाच यंदाच्या वर्षात परतीच्या पावसाने आणि प्रतिकूल हवामानामुळे नेवासा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वच पिकांचे दर वर्षभरात कधी सावरले नाहीत, रोगराईने मात्र कहर केला आहे.

ऊस क्षेत्र कमी झाल्याने तालुक्‍यातील साखर कारखानदारीही अडचणीत सापडली आहे. त्याचा परिणाम म्हणून नेवासा तालुक्‍यातील शेतकरी पुर्णपणे हतबल झाल्याचे चित्र 2019 या वर्षात दिसून आले. नेवासा तालुका हा बहुतांश प्रमाणात बागायती तालुका आहे.

मुळा, गोदावरी, प्रवरा, मुळा डावा कालवा, जायकवाडी धरणाचा बॅकवॉटर या जलस्रोतमुळे तालुक्‍यात सर्वत्र सुजलाम सुफलाम चित्र दिसून येते. तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेती समृद्ध केली आहे. मात्र गेल्या दोन वर्षात वरुणराजाने तालुक्‍याकडे पाठ फिरवल्याने शेती अडचणीत आली आहे. साखर कारखानदारी ही तालुक्‍याचा आर्थिक कणा असून ऊस उत्पादन तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे प्रगतीचे आर्थिक साधन ठरले आहे.

मात्र मागील दोन वर्षात तालुक्‍यातील उसाचे क्षेत्र घटल्याने याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झालेला आहे. गेल्या दोन वर्षात पाण्याआभावी तसेच रोगाच्या प्रादुर्भावमुळे तालुक्‍यातील ऊस व अन्य पिके नष्ट झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांनी उसाची शेती मोडून इतर फळपिकाकडे मोर्चा वळवला. मात्र गेल्या वर्षभरात आगोदर दुष्काळामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि त्यानंतर डाळिंबासह विविध फळबागा व इतर पिकांवरही रोगराईचा मारा झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे.

पाणीटंचाई आणि किफायतशीर दराअभावी ऊस शेती परवडत नाही म्हणून फळबागाकडे मोर्चा वळवला तर तिथेही रोगराई आणि दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. 2019 या वर्षात हे संकट अधिक गडद झाले असून यंदा शेतकऱ्यांना ना उसाचे उत्पादन आहे, ना फळपिकांच्या उत्पन्नातून खर्च वसूल होण्याची शक्‍यता आहे.

त्यामुळे यंदाच्या वर्षात नेवासा तालुक्‍यातील शेतकरी कधी नव्हे एवढ्या मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जात आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाचा परिणाम नेवासा, सोनई, कुकाणा, भेंडा, घोडेगाव, माका या गावातील बाजारपेठावर झाल्याचा दिसत आहे. यंदा मुळा धरण 100 टक्के भरले आहे. यावर्षी उसाची लागवडही सुरू असून नव्याने साखर कारखानदारी आणि शेतकरीही उभारी घेईल असे चित्र निर्माण झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.