पावसाळ्यातही टॅंकर हटेना…!

पूर्वी प्रचंड पावसाचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुरंदर तालुक्‍यात सध्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेला टॅंकरवर अवलंबून राहावे लागत आहे. किल्ले पुरंदर परिसरात पावसाचे आगमन जोरदार झाले असले तरी तालुक्‍यातील पूर्व भाग अजूनही टॅंकरवरच अवलंबून आहे. जलयुक्त शिवार योजनेचे अपयश, जलसंधारणाच्या कामात प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता याचा परिणाम स्वरूप तालुक्‍याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ व तीव्र पाणीटंचाई ही कायमच राहिलेली आहे.

याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर स्वरूप धारण करू लागल्याने पशुधन वाचवायचे कसे, या समस्येने शेतकरी व पशुपालक ग्रासला आहे. शेतीला पूरक धंदा म्हणून बहुसंख्य शेतकरी दूध विक्रीचा व्यवसाय करतो. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बळीराजाला शेतीचे उत्पन्नही नाही आणि पशुधन वाचवण्यासाठी चाराही मिळत नाही. तालुक्‍यातील शासकीय चारा छावण्यांच्या उभारणीबाबत प्रशासनाने पहिल्यापासूनच उदासीनता दाखविल्याने एकीकडे पिण्यासाठी पाणी नाही, दुसरीकडे जनावरांसाठी चारा नाही, अशा दुहेरी विवंचनेत बळीराजा अडकलेला आहे.

तालुक्‍यात जेजुरी हे जगप्रसिद्ध देवस्थान आहे. या ठिकाणी देखील नगरपालिकेने अतिशय योग्य नियोजन करून देखील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जेजुरी आणि सासवड नगरपालिकेला मध्यंतरी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. आताही बहुसंख्य गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी तालुक्‍यात वृक्षारोपण करणे, जलसंधारणाची कामे करणे या बाबींकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाच्या आगमनामुळे तालुक्‍यातील काही भागात थोडेसे पाणी वाहू लागले आहे; परंतु प्रशासकीय यंत्रणांनी मात्र असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवलेला आहे की, तालुक्‍यातील दुष्काळ आणि पाणीटंचाई हटलेली आहे. वास्तविक, तालुक्‍यातील काही विशिष्ट भागांतच पाऊस पडला आहे आणि तालुक्‍यात टॅंकरवर अवलंबून असलेल्या गावांची संख्या आजही मोठी आहे. पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागणे, हे प्रशासकीय यंत्रणांचे अपयश नाही का, असा प्रश्‍न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)