सोमेश्‍वर परिसरात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली

13 दिवसांपासून संततधार : आतापर्यंत 256.9 मिमीची नोंद

– तुषार धुमाळ

वाघळवाडी – सोमेश्‍वरनगर परिसर गेल्या 13 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. 1 जूनपासून आतापर्यंत 256.9 मिमी, तर जुलै महिन्यात 193.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. एकट्या जुलै महिन्यातच सरासरीपेक्षा 131 मिमी अधिक पाऊस नोंदवला गेला असून जुलै अखेरीस पर्यंत एकूण वार्षिक सरासरीपेक्षा 35 मिमी पाऊस अधिक असल्याचे होळ-सोरडेवाडी (ता. बारामती) येथील एम. ए. सी. एस आघारकर संशोधन संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

बारामती तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील निंबूत, वाघळवाडी, वाणेवाडी, मुरूम, सोरटेवाडी, 8 फाटा, 10 फाटा, होळ, करंजे, देऊळवाडी, वाकी, चोपडा, पळशी, भापकरमळा परिसरात जुलै महिन्याच्या सुरुवातीला अत्यल्प पाऊस होता; मात्र मागील 12 ते 13 दिवसांपासून पावसाची संततधार तर मधूनच दमदार पाऊस कोसळत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

संततधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले असून शेतीची कामे ठप्प झाली आहेत. पिकांमध्ये तणाचे प्रमाण वाढले असून पावसामुळे खुरपणीची कामे करता येत नसल्याने शेतकरी पावसाच्या विश्रांतीची वाट पाहत आहेत.

सोमेश्‍वर परिसरामध्ये सध्या संततधार पाऊस कोसळत असून 13 दिवसांपासून सूर्य प्रकाश कमी असल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या सरीमध्ये जास्तीचे साठलेले पाणी काढून टाकण्याचा प्रयत्न करावा. तसेच पिकांची पाने पिवळी पडली असतील तर गरज भासल्यास वातावरणाचा बदल पाहून मिश्र खतांचा वापर करावा. पिकांमध्ये तण वाढल्यास पाऊस थांबल्यानंतर खुरपणी करून घ्यावी. ढगाळ वातावरणामुळे संततधार पावसामुळे किडीचा व रोगांचा प्रादुर्भाव वाढत असतो, याबाबतचे योग्य मार्गदर्शन घेऊन खरीप हंगामाचे नियोजन करावे. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कमी कालावधीमध्ये उत्पादन देणारी पिके घ्यावीत.
– अजित चव्हाण, प्रक्षेत्र प्रभारी अधिकारी, एमएसीएस आघारकर संशोधन संस्था, होळ-सोरटेवाडी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.