वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात पावसाचे आगमन 

कर्जत – कर्जत तालुक्‍यात शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. दुरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पत्रे उडाले. तसेच बाबासाहेब पोपट शेख यांचा जनावरांचा गोठा जमीनदोस्त झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तळवडी येथे केतन पवार यांची गाय व शेळी यामध्ये दगावली.

शुक्रवारी दिवसभर उकाडा जाणवत होता. सायंकाळी चारच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे पशुपालकांची चांगलीच धावपळ उडाली. दुरगाव येथे घरे तसेच जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे उडाले. मुसलमान वस्ती, थोटेवाडी, भगतवस्ती येथे मोठे नुकसान झाले. छावणीतील पशुपालकांचीही चांगलीच तारांबळ उडाली. तालुक्‍याच्या विविध भागात अर्धा तास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.